मनपा क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ

0
11

सांगली, दि. १० (जिमाका) : शासन विविध योजना राबवित असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.

      विकसित भारत संकल्प यात्रेचा महानगरपालिका क्षेत्रातील शुभारंभ आज मारूती चौक सांगली येथे पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, प्रकाश ढंग, श्रीकांत शिंदे, प्रकाश बिरजे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की,  विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ महानगरपालिका क्षेत्रात झाला असून सांगली, मिरज व कुपवाड शहरातील विविध भागात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारा रथ जाणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात या यात्रेची सांगता २१ जानेवारी रोजी होणार आहे. जे लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत त्यांना चांगले मार्गदर्शन करावे. सर्व कागदपत्रांची माहिती देवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की, शासन विविध योजनांच्या माध्यमातून वंचितांना न्याय देण्याचे काम करीत आहे. नागरिकांनी विविध योजनांच्या माहितीसाठी लावण्यात आलेल्या स्टॉलला भेटी देवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे महानगरपालिका क्षेत्रात आगमन झाल्याचे सांगून हा रथ केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील संपूर्ण प्रभागामध्ये जाणार असल्याचे सांगितले. सर्वांनी शासनाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे सांगून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी कमल शिर्के व राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत स्वनिधीचा लाभ घेतलेल्या अनिता लोंढे यांनी मनोगतात शासनाच्या योजनेचा कसा लाभ मिळाला याबद्दल माहिती सांगून शासनाचे आभार मानले.

कार्यक्रम स्थळी प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी घरे, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आदि योजनांची माहिती देणारे स्टॉल, आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी स्टॉल, तसेच आरोग्य  विभागाच्या वतीने आरोग्य तपासणीसाठीचा स्टॉल लावण्यात आले होते.

दीपक चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. उपायुक्त राहुल रोकडे यांनी आभार मानले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here