लिंबूवर्गीय फळपिकांसाठीच्या तीन सिट्रस इस्टेटसाठी ७ कोटींचा निधी

0
2

मुंबई, दि. 12 : जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका उमरखेड, अमरावती, सिट्रस इस्टेट, धिवरवाडी, नागपूर, सिट्र्स इस्टेट तळेगाव, वर्धा येथील शासकीय तालुका फळरोपवाटिकांमध्ये लिंबूवर्गीय फळपिकांकरिता सिट्रस इस्टेट स्थापन करण्यात आली आहे. या सिट्रस इस्टेटसाठी 7 कोटी 24 लाख 67 हजार रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.

सिट्रस इस्टेटसाठीच्या या निधीचे वितरण पुढील प्रमाणे होणार आहे. उच्चतंत्रज्ञान  आधारीत रोपवाटीका स्थापन करण्यासाठी 35 लाख 65 हजार रुपये, त्यापैकी 6 लाख 15 हजार रुपये धिवरवाडी ता.काटोल, जि. नागपूरसाठी तर 29 लाख 50 हजार रुपये तळेगाव ता. आष्टी. जि. वर्धासाठी वितरित करण्यात येणार आहे. उमरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती येथील सिट्रस इस्टेटसाठी प्रशासकीय इमारत बांधकाम, कार्यालय, प्रयोगशाळा, प्रशिक्षण भवन, निविष्ठा विक्री केंद्र इत्यादीसाठी 1 कोटी, तिन्ही सिट्रस इस्टेटमध्ये अवजारे बँक स्थापनेसाठी 2 कोटी 14 लाख, माती, पाणी, उती व पाने चाचणी प्रयोगशाळा आणि जिवाणू खते उत्पादनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी 3 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या सिट्रस इस्टेटचे कृषी आयुक्तालय स्तरावर कृषी आयुक्त, पुणे, विभाग स्तरावर विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर आणि जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अमरावती, नागपूर, वर्धा, छत्रपती संभाजी नगर हे सनियंत्रण करणार असल्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here