पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ‘जनतेशी सुसंवाद’; विविध दाखल्यांचे वितरण

मुंबई, दि. 17 : शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला. ‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. नागरिकांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश श्री.केसरकर यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

‘जनतेशी सुसंवाद’ या कार्यक्रमांतर्गत मंत्री श्री.केसरकर हे दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांच्या समस्या जाणून घेतात. त्याचप्रमाणे नागरिकांना हव्या असलेल्या दाखल्यांचे वितरण तातडीने केले जात आहे. त्याप्रमाणे विविध दाखले नियोजित वेळेत मिळत असल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

आज आयोजित ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमप्रसंगी अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर, सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते आज रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी प्रमाणपत्र, गौण खनिज प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित नागरिकांचे नॉनक्रिमी लेअर, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला मिळण्याबाबतचे अर्ज स्वीकारण्यात आले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/