उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांची पाहणी

पुणे, दि. १९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानकपणे कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामांची पाहणी केली. त्यांनी रस्त्याच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या कामासाठी राज्य शासनातर्फे २०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत विषय मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

श्री.पवार म्हणाले, कात्रज चौक उड्डाणपूल ६५०-७०० मीटर पुढे वाढवावा. खडी मशीन चौकापासून पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता रुंदीकरण करण्यात यावे. खडी मशीन चौकापासून कान्हा हॅाटेलकडे येणारा एकतर्फी मार्ग तात्काळ चालू करायचे निर्देश त्यांनी दिले. रस्त्यासाठी जमीन ताबा देणाऱ्यांना त्यांनी व्यक्तीश: धन्यवाद दिले.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी रस्त्याच्या कामाविषयी माहिती दिली. उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला या कामाबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार चेतन तुपे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महेश पाटील आदी उपस्थित होते.

परिसरातील नागरिकांच्यावतीने उपमुख्यमंत्री श्री.पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार रस्त्याच्या एक बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

00000