सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना कृत्रिम अवयव वाटप

पुणे दि.२०-फियाट ऑटोमोबाईल्स प्रा. लिमिटेड रांजणगाव यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम अवयवाचे वाटप सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील दिव्यांग मुलांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्री. वळसे पाटील यांनी यावेळी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, फियाट इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बवेजा, सहाय्यक उपाध्यक्ष संचिता कुमार, प्रदीप मुनगंटीवार, गट शिक्षण अधिकारी सविता माळी गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे, प्रदीप वळसे पाटील, बाळासाहेब बाणखेले, उदय पाटील, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.वळसे पाटील म्हणाले, समाजामध्ये अनेक मुलं हे दिव्यांग असल्याने त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. त्यांना वेळीच मदतीचा हात दिल्यास त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होऊन ते सक्षमपणे जीवन जगू शकतील. यासाठी  फियाट इंडिया ऑटोमोबाईल्सने जुन्नर, आंबेगाव व खेड या तीन तालुक्यातील दिव्यांगांसाठी कृत्रीम अवयवे व संसाधने वाटप करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.  या उपक्रमामुळे  या दिव्यांग मुलांच्या जीवनात  आशेचा किरण निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री. बवेजा आणि  संचीता कुमार यांनीही  मनोगत व्यक्त केले. शिबिरात  १५३ दिव्यांग विद्यार्थ्यांना मंत्री वळसे पाटील, राकेश बवेजा यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व संसाधनांचे वाटप करण्यात आले.

महाविद्यालयाला ४० संगणक भेट

फियाट ऑटोमोबाईल्स प्रा. लिमिटेड रांजणगाव यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मंचर येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाला ४० संगणक भेट देण्यात आल्याने तयार करण्यात आलेल्या संगणक प्रयोगशाळेचे उदघाटन मंत्री श्री.वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन एस. गायकवाड. उदय पाटील, बाळासाहेब बाणखेले यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतांना  श्री.वळसे पाटील म्हणाले, फियाट कंपनीच्या माध्यमातून मिळालेले संगणक संच, याचा फायदा महाविद्यालयीन विद्यार्थीनी चांगल्या पद्धतीने करावा आणि रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करून घ्यावे.  स्वतः रोजगार निर्मिती करून सक्षम बनावे. स्पर्धेच्या युगात उन्नत संगणकीय ज्ञान  आवश्यक असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातच ते आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.

०००