पीठासीन अधिकारी व सचिवांच्या परिषदेच्या अनुषंगाने काटेकोरपणे नियोजन करावे – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई, दि. २३ : अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव यांची २७, २८ व २९ जानेवारी, २०१४ या कालावधीत विधान भवन येथे परिषद होणार आहे. या परिषदेच्या अनुषंगाने शासनाच्या सर्व यंत्रणांनी  काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केल्या.

विधानभवन येथे अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व विधिमंडळ सचिव यांच्या होणाऱ्या परिषदेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ॲड. नार्वेकर बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे  प्रधान सचिव विकास खारगे, लेखा, कोषागरे विभागाचे सचिव एन.रामास्वामी, विधान मंडळ सचिवालयाचे सचिव  कार्यभार (१)  जितेंद्र भोळे, सचिव कार्यभार (२) डॉ. विलास आठवले, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, प्रादेशिक मौसम केंद्राचे उपमहानिदेशक सुनील कांबळे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यासह इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे या परिषदेचे अध्यक्षस्थानी राहतील. या परिषदेकरिता राज्यसभेचे उपसभापती तसेच देशभरातील राज्य विधानमंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उप सभापती, महासचिव, लोकसभा आणि राज्यसभा तसेच विधानमंडळ सचिव उपस्थित राहणार आहेत.

अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, या परिषदेनिमित्त हॉटेल्समध्ये कक्ष आरक्षित करणे, वाहनांची उपलब्धता, वाहनांच्या पार्किंगकरीता व्यवस्था, परिषद कालावधीतील सुरक्षा, सर्व मान्यवरांचे आगमन ते परत जाईपर्यंतच्या सर्व व्यवस्था करावयाच्या असून दृष्टीने मंत्रालय, पोलीस विभाग,परिवहन विभाग, आरोग्य विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पर्यटन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई महानगरपालिका, पश्चिम व मध्य रेल्वे अधिकारी, विमानतळ अधिकारी सर्वांनी समन्वयाने कामे करावेत.

००००

संध्या गरवारे/विसंअ/