नंदुरबार, दि. (जिमाका वृत्त) : राज्यात व जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन सज्ज असून कोणत्याही आपत्तीत शासन जनतेप्रती वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.
ते आज पोलीस कवायत मैदानावर 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, गणेश मिसाळ, कल्पना निळ-ठुबे, उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व विविध यंत्रणांचे प्रमुख-कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात भीषण टंचाई आणि दुष्काळाचे सावट आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन, प्रशासन जनतेच्या पाठीशी उभे आहे. जिल्ह्यातील 36 महसूल मंडळांपैकी नंदुरबार, शहादा, तळोदा या तीन तालुक्यातील 21 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून जमीन महसूलात सुट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषि पंपांच्या चालू विजबिलात 33 पूर्णांक 5 टक्के सुट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ, रोजगार हमी योजनेच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे यासारखे दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच नंदुरबार तालुक्यातील 155 गावांमधील 51 हजार 228 शेतकऱ्यांना सुमारे 72 हजार हेक्टर आर. एवढ्या क्षेत्रासाठी 67 कोटी 67 लाख 43 हजार 305 रूपये रूपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे 5 हजार 756 शेतकऱ्यांच्या सुमारे 2 हजार 851 हेक्टर आर. पेक्षा जास्त शेतजमीनीचे नुकसान झाले आहे. त्यासाठी 4 कोटी 95 लाख 43 हजार रूपये एवढे अनुदान शासनाने उपलब्ध करून दिले असून आत्तापर्यंत 4 हजार 343 शेतकऱ्यांना 3 कोटी 79 लाख 23 हजार 274 रूपये ऑनलाईन प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आले आहेत.
ते पुढे म्हणाले, दुष्काळाच्या समस्येवर कायमस्वरूपी व शाश्वत स्वरूपाची उपाययोजना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार ही योजना जिल्ह्यातील 124 गावांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 5 हजार 622 कामांना जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे 758 टीएमसी जलसाठा निर्माण होवून 2 हजार 274 हेक्टर क्षेत्रास त्याचा लाभ होणार आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात 1 लाख 56 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला असून 257 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.
जिल्ह्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती संदर्भात आढळून आलेल्या नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तिंना जातीचे प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी मंडळ निहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबांची माहिती 23 जानेवारी 2024 पासून संकलित केली जात असून ती 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करण्यात येईल. शासन आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित ‘सेवा महिन्यात’ जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत 94 हजार 500 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत, असेही यावेळी पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात पाच दिवसीय ‘महासंसस्कृती’ महोत्सव तसेच राज्याचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानमित्त त्यांच्या जीवनावर आधारित महानाट्य ‘जाणता राजा’ आयोजन 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ जिल्हा वासीयांनी घ्यावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले आहे.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात सशस्त्र सेनादल वैद्यकीय महाविद्यालय, पुणे व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी जनतेतील सिकलसेल आजाराविरोधात लढा दिला जात आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने कॅपिलरी झोन हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस ही रक्ताची तपासणी करण्यात येत आहे, तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांची एक ऑनलाईन नोंदणीसाठी केअर फॉर सिकल नावाचे वेब पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे वेळेत, अचूक निदान, सर्व नोंदींचे जतन करणे, तसेच बाधित व वाहक रुग्णांचे समुपदेशन करण्यात येत आहे. सिकलसेल निर्मूलनासाठी ही लॅब एक मैलाचा दगड आहे. आज अखेर एक लाखापेक्षा जास्त नागरिकांची तपासणी करण्यात आलेली आहे. या लॅबच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी व बालकांच्या तपासणीचे नियोजन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्यात संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 96 टक्के इतके झाले असून सुरक्षित मातृत्व व सुरक्षित बालकांच्या भविष्याच्या दृष्टिने हे चित्र निश्चितच आशादायी आहे.
जिल्ह्यात 11 गावात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली असून त्यात 390 उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमांत महाविद्यालयीन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील 75 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातील विभागस्तरावर अंतीम निवड झालेल्या 6 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बिजभांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने शाळांमध्ये अग्नीशमन व स्वयंचलित फॉयरबॉल यंत्रणा, डिजिटलायजेशन, जलशुद्धीकरण व शितकरण यंत्रणा, बेंचेस, प्रथमोपचार पेट्या पुरवण्यासाठीच्या 12 कोटी 32 लाखांच्या नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर नवभारत साक्षरता अभियानात 1 लाख 38 हजार असाक्षर प्रौढांना साक्षर करण्यात येत आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासांचे सुक्ष्म नियोजन केले जाते. वर्ष 2024-25 साठी 432 कोटी 85 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी देण्यात आली असून त्यातील सर्वसाधारण योजनेत 143 कोटी रूपये, आदिवासी उपयोजनेत सुमारे 277 कोटी 85 लाख 40 हजार, तसेच अनुसुचित जाती उपयोजनेसाठी 12 कोटी रूपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील आदित्य ब्राह्मणे यास मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार नुकताच महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. आदित्य याने आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला. त्याच्या या शौर्यास प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने विनंम्र अभिवादनही पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातून केले.
देशाच्या प्रजासत्ताक होण्याच्या प्रक्रियेबद्दल आपल्या भाषणातून गौरवोद्गगार काढताना पालकमंत्री म्हणाले,जिल्ह्यात विविध घरकुल योजना, आदिवासी बांधवांसाठी वैयक्तिक व सामुहिक विकासाच्या विविध योजना,जलजीवन मिशन, शासन आपल्या दारी, शासन दिव्यांगांच्या दारी, आदिवासी जनजाती गौरव दिवस,विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ तळागाळात पोहचवल्या जाताहेत, त्याबद्दल सर्व संबंधित यंत्रणांचे अभिनंदन करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.
यांचा झाला सन्मान…
ध्वजनिधी संकलनात 104 टक्के इष्टांक वसूल केल्याबद्दल स्मृतिचिन्ह.
- जिल्हाधिकारी नंदुरबार
- जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नंदुरबार
मुंबई शहर जलद प्रतिसाद पथकात कठीण व खडतर सेवा केल्याबद्दल सन 2022-23 वर्षासाठी मुंबई शहर जलद प्रतिसाद पथकाचे विशेष सेवा पदक व प्रशस्तीपत्र प्रदान.
- राजेश गावीत, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस निरिक्षक कक्ष, नंदुरबार
- प्रदीप वळवी, पोलीस नाईक, शहर वाहतुक शाखा नंदुरबार
- कृष्णा जाधव, पोलीस शिपाई, पोलीस स्टेशन शहादा
- अशोक वसावे, पोलीस शिपाई, जलद प्रतिसाद पथक, पोलीस मुख्यालय नंदुरबार
उत्कृष्ट वन व वन्यजीव संरक्षण, अतिक्रमण निर्मूलन मोहिम यशस्वी राबवून 1525 हेक्टर वनजमीन शासन ताब्यात घेतली. या उत्तम कार्याबद्दल सन्मानचिन्ह.
श्रीमती स्नेहल अवसरमल, वनपरिक्षेत्र अधिकारी, रोहयो नंदुरबार
- अरविंद निकम, वनपाल, भांगडा
- किसन वसावे, वनरक्षक भांगडा
- श्रीमती नयना हडस, वनरक्षक सोनपाडा
- श्रीमती प्रियंका निकुंबे, वनपाल, भांगडा
एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना प्रशस्तीपत्र.
- जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार
- मेडिकल सर्जिकल आणि डेन्टल हॉस्पीटल, नंदुरबार
“महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेज” उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेत्यांना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत प्रत्येकी रुपये 1 लाख बीजभांडवल, प्रमाणपत्र.
- दिनेश गिरासे
- अन्सारी सुफीयान
- पठाण फैजनखान इरफानखान
- आर्या बागुल
- शेख रियान मुक्तार
- सईद सैफ सईद नैमुद्दीन
तसेच सोहम रमेश वसावे, एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, चिंचपाडा, ता. नवापूर, या विद्यार्थ्यांने “बेबी केअरिंग बेड” हे उपकरण तयार केले. या उपकरणास आंतराष्ट्रीय स्तरावर नॉमिनेशन करण्यात आल असल्यामुळे या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल, एस. ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शासकीय आश्रमशाळा इंग्रजी माध्यम, नंदुरबार व नवोद्यय विद्यालय, श्रावणी या विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी योगा आणि पिरॅमिड व देशभक्तीपर नृत्य सादर केले.
000000000