पंजाबच्या रुरल ऑलिम्पिक प्रमाणे राज्याचा पारंपरिक क्रीडा महोत्सव दरवर्षी व्हावा – राज्यपाल रमेश बैस

0
6

राज्यपालांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाचा शुभारंभ

आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना

मुंबई दि. २६: पंजाबमध्ये होत असलेल्या ‘किला रायपूर खेल महोत्सव’ अर्थात रूरल ऑलिम्पिक प्रमाणे महाराष्ट्रातील कबड्डी, खोखो, दांडपट्टा आदी पारंपरिक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेला क्रीडा महाकुंभ दरवर्षी भरवला जावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या  ३५० व्या वर्षानिमित्त यंदा प्रथमच आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ’ या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन शुक्रवारी (दि. २६) राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत जांबोरी मैदान, मुंबई येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

महाकुंभाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई व उपनगर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, क्रीडा भारतीचे गणेश देवरुखकर तसेच मोठ्या संख्येने पारंपरिक क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

महाराष्ट्राला पारंपरिक खेळांची मोठी परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः तलवारबाजी, घोडेस्वारी, भालाफेक व इतर क्रीडा प्रकारांमध्ये निपुण होते. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला चालना दिली. महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले असे सांगून पारंपरिक क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र महोत्सव सुरु केल्याबद्दल राज्यपालांनी राज्य शासन, महानगर पालिका व क्रीडा भारतीचे अभिनंदन केले.

आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करताना मातृभाषा व  मातृभूमी यांसह स्वदेशी खेळांना प्रोत्साहन द्यावे लागेल असे सांगून, कुलपती या नात्याने राज्यातील विद्यापीठांना पारंपरिक खेळांना चालना देण्याची आपण सूचना करु, असे राज्यपालांनी सांगितले.

आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोक मोबाईल फोनचा अति वापर करताना दिसतात. समाजात मादक पदार्थांचा विळखा वाढत आहे. अशावेळी युवकांना पारंपरिक तसेच आधुनिक खेळांकडे प्रयत्नपूर्वक वळवले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे सर्व जिल्ह्यात आयोजन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पारंपरिक मैदानी खेळाला पुनर्जीवित करून त्याला उजाळा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेसाठी लागणारी सर्व यंत्रणा उपलब्ध करून देण्यात  येईल. तसेच या स्पर्धासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूदही  राज्य शासनामार्फत करण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना चांगले बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून एक आगळावेगळा उपक्रम आपण सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० महोत्सव राज्यभर साजरा केला जात आहे. एक वेगळीच जोड आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण करून दिली आहे, ती कौतुकास्पद बाब आहे.  राज्यातील गड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी व त्याविषयी माहिती होण्यासाठी गड किल्ल्याचे प्रदर्शन भरवले जात आहे. ही खरी शिवाजी महाराजांची आठवण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  खेळाला प्रोत्साहन दिले आहे. आपल्या राज्याला लाल मातीची परंपरा आहे. खेळाडूंना आपला साहस दाखवण्यासाठी त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. खेळाडूंना पुढे येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सुरुवातीला लेझीमच्या गजरात राज्यपालांनी मशाल पेटवून महाकुंभाचे उदघाटन केले. राज्यपालांसमोर तलवारबाजी व दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महाकुंभाचे आयोजन महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगर पालिका व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. दि. २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या दरम्यान पारंपरिक क्रीडा स्पर्धा होणार आहेत.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here