‘एनडीडीबी’चा अहवाल प्राप्त होताच पुढील निर्णय घेणार
लातूर, दि. 29 (जिमाका): उदगीर येथील शासकीय दूध योजना प्रकल्प सुरु झाल्यास येथील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मदत होणार आहे. दूध उत्पादक शेतकरी, पशुपालकांचे हित लक्षात घेवून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी केंद्र शासनामार्फत संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी आज दिली.
उदगीर शासकीय दूध योजना प्रकल्पाच्या प्रांगणात आयोजित दूध व्यावसायिक, पशुपालक व शेतकरी संवाद कार्यक्रमात ना. रुपाला बोलत होते. खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, दिलीप देशमुख यांची यावेळी उपस्थिती होती.
लातूर जिल्ह्यात दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी दूध व्यवसाय हा आर्थिक उत्पन्नाचे चांगले साधन ठरेल. उदगीर शासकीय दूध योजनेच्या माध्यमातून यापूर्वीही या भागात दुग्ध व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे सुरु होता. या प्रकल्पाला गतवैभव मिळवून दिल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ होईल. त्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मदतीने उदगीर शासकीय दूध योजना प्रकल्प नव्याने सुरु करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे ना. रुपाला म्हणाले.
उदगीर शासकीय दूध योजना प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाला (एनडीडीबी) देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ‘एनडीडीबी’च्या पथकाने प्रकल्पाची पाहणी करून आवश्यक माहिती घेतली आहे. त्याबाबतचा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे ना. रुपाला यांनी सांगितले. तसेच दूध उत्पादक शेतकरी आणि पशुपालक यांच्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे पशुपालन व्यवसायात अमुलाग्र बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.
उदगीर शासकीय दूध योजना प्रकल्प सुरु होण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे केंद्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला स्वतः उदगीर येथे प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले असल्याचे सांगून हा प्रकल्प जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. त्यामुळे हा प्रकल्प सुरु करण्याच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देण्याची विनंती खासदार सुधाकर शृंगारे यांनी यावेळी केली.
प्रारंभी प्रास्ताविकात संतोष कुलकर्णी यांनी उदगीर शासकीय दूध प्रकल्पाविषयी माहिती दिली.
उदगीर शासकीय दूध योजना प्रकल्पाची पाहणी
केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी उदगीर येथील शासकीय दूध योजना प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी रितेश मत्ते आणि लातूर जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी तथा उदगीर शासकीय दूध योजनेचे उप दुग्धशाळा व्यवस्थापक माणिक लटपटे यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव यावेळी उपस्थित होते.
दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गौरव
जिल्ह्यात मदर डेअरीच्या माध्यमातून दररोज 65 हजार लिटर दूध संकलन सुरु आहे. या अंतर्गत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या उत्कृष्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांचा केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये लक्ष्मी सावंत, विद्या गणगे, अश्विनी फुलसुंदर, रवी अडणक, बाबासाहेब घुटे या शेतकऱ्यांचा समावेश होता.
*****