मुंबई, दि. 29 :- कोणत्याही दबावाला मानसिक तयारीने जिंकता येते. विद्यार्थ्यांनी परीक्षांचा ताण न घेता नियमित सराव करून त्यात सुधारणा करीत राहिल्यास यश सहज साध्य करता येईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
‘परीक्षा पे चर्चा’ या नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री. मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते. मुंबईत राजभवन येथे आयोजित या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्यासह शालेय विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा आवश्यक असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी प्रतिभावान मित्र वाढवावेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी, असा सल्ला प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, स्पर्धा नसेल तर जीवन चेतनाहीन बनेल. यासाठी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी इर्षा न ठेवता स्वतःशी स्पर्धा करून प्रगती होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, आत्मविश्वास बाळगावा, शिक्षणाबरोबरच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यायाम आणि खेळ यांचाही मेळ साधावा. स्वस्थ मनासाठी स्वस्थ शरीराची आवश्यकता असून त्यासाठी सूर्यप्रकाश, पूर्ण झोप आणि संतुलित आहार या बाबी गरजेच्या असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तंत्रज्ञानापासून आपल्याला दूर जाता येणार नाही, तथापि, त्याचा अती वापर टाळून योग्य वापर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लिहिण्याचा सराव कमी होत आहे, याचा दुष्परिणाम परीक्षेमध्ये दिसून येतो. यासाठी विद्यार्थ्यांनी लिहिण्याचा सराव नियमित ठेवून ते तपासावे आणि त्यात सुधारणा कराव्यात, यामुळे परीक्षेत येणारा ताण निश्चित कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना ताण येणार नाही यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे सांगून श्री.मोदी यांनी त्यांना विद्यार्थ्यांसोबत सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी बंध वाढवावेत. विद्यार्थ्यांची इतरांशी तुलना न करता त्यांच्यातील गुणांचे कौतुक करावे, यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांची तुकडी बदलते तथापि शिक्षक तेच असतात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यास त्यांच्यावरील ताण निश्चित कमी होऊ शकेल.
विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनविण्यावर भर देण्याची आवश्यकता – राज्यपाल रमेश बैस
शिक्षणाला सुखद अनुभव बनवून तसेच नैतिक मूल्यांवर लक्ष देऊन विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा संदेश अंगिकारुन विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असा सल्ला त्यांनी दिला.
राज्यपाल म्हणाले, शिक्षण जितके वर्गामध्ये मिळते तितकेच ते वर्गाबाहेरही मिळते. यामुळे मध्यंतराची वेळ हा अपव्यय न समजता खेळण्यासाठीचा आणि मध्यंतराचा वेळ वाढवावा. शिक्षण अधिक प्रयोगआधारित आणि संवाद आधारित होण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना अधिक गृहपाठ न देता शाळेतच अभ्यास आणि स्वाध्याय करून घ्यावा अशी सूचना करून विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठीचे हे पहिले पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण व शहरी क्षेत्रांतील शाळांमध्ये मोठी असमानता असल्याचे नमूद करून शाळांमधील ही असमानता कमी करण्याची आवश्यकता असल्याचे राज्यपाल श्री.बैस यांनी यावेळी सांगितले. भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. याचा उपयोग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी व्हावा. ऑनलाईन तसेच ऑफलाईन शिक्षणाचा योग्य मेळ साधला जावा. शिक्षकांना आणखी सक्षम बनविण्यासाठी नियमित प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना करून शाळांचा परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना त्याचे मनोबल वाढविले होते. त्यांचे शब्द आज देखील प्रासंगिक आणि प्रेरणादायी ठरतात, असे सांगून राज्यपाल श्री.बैस यांनी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे मार्गदर्शन आत्मविश्वास वाढवून सकारात्मक ऊर्जा देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्री श्री.मोदी हे दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवित असल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून राज्यपालांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुंबईतील गोपी बिर्ला मेमोरियल स्कूल, जी.डी.सोमाणी स्कूल तसेच सर तय्यबजी स्कूलच्या सुमारे 300 विद्यार्थी सहभागी झाले.
000
बी.सी.झंवर/विसंअ/