गोदा आरतीकरीता स्थायी सुविधा पुरविण्यासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करून देणार : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
12

नाशिक, 29 जानेवारी 2024 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक शहरात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या स्थायी सुविधा पुरविण्यासाठी रूपये 10 कोटी रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आज जिल्हाधिकारी  कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गोदावरी आरती संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  डॉ.भारती पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे,  सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज आहेर, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ,  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, उप वनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, उप वनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, रामतीर्थ गोदावरी सेवा सेवा समितीचे सदस्य, गोदा आरती सेवा संघ सदस्य, पुरोहित संघाचे पदाधिकारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लोकप्रतिनिधी समवेत शहारात गोदा आरती सुरू करण्याबाबत चर्चा करून सर्व आवश्यक बाबी आंतर्भूत करून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा. यात डिजीटल एलईडी स्क्रीन, साऊंड सिस्टीम, लाईव्ह स्क्रीनिंग, एलईडी हायमास्ट, कुशल ऑपरेटर्स यासह देखभाल व दुरूस्ती यांचा सामवेश असावा. याकामासाठी 10 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. परंतु सदर काम अडीच महिन्यांच्या कालावधीत वेगाने करण्याच्या सूचना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, गोदा प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला 56 कोटी 45 लाखांचा आराखड्यात विद्युत विषयक, स्थापत्य विषयक, जलशुद्धीकरण प्रक्रिया विषयक बाबी, व इतर अनुषंगिक बाबींचा समावेश आहे परंतु लोकप्रतिनिधींशी चर्चा करून यात अजून आवश्यक बाबींचा समावेश करून सुधारीत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा जेणेकरून  मुख्यमंत्री महोदयांसमवेत यावर चर्चा करून निधी उपलब्धतेबाबत निर्णय घेता येणे शक्य होईल. या संदर्भात दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

गोदा आरतीच्या माध्यमातून नाशिक पर्यटनास मिळणार बुस्ट : डॉ.भारती पवार

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यावेळी म्हणाल्या, गोदा प्रकल्पाबाबत सुक्ष्म नियोजन करून यात आरतीसाठी येणाऱ्या भाविकांना बसण्याची व्यवस्था, आरतीच्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी होणार नाही यासाठी प्रवेशासाठी व बाहेर पडण्यासाठीची व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, त्याचप्रमाणे आरतीचे लाईव्ह स्क्रिनिंगचे नियोजन सुत्रबद्धतेने झााले पाहिजे. गोदा आरती प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक पर्यटनाला बुस्ट मिळणार असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींसह समिती सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचेही मंत्री महोदयांनी स्वागत करीत यावर कार्यवाही करण्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here