शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान

विद्यार्थीदशेत शिक्षणासोबत स्वच्छतेची गोडी लागल्यास स्वच्छता ही विद्यार्थ्याच्या आयुष्याचा भाग बनून जाते. शाळा स्वच्छतेच्या कार्यात त्यांना सकारात्मकपणे सहभागी करुन शिक्षण आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्मिती होण्यासह वैयक्तिक स्वच्छतेची सवय जडते. राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थीदशेतच स्वच्छतेचे संस्कार होण्यास मदत होणार आहे.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अभियान सद्यस्थितीत राज्यभरात सुरू असून १५ फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

राज्यात २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ही राज्य शासन पुरस्कृत योजना राबविण्यात येते. भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे या योजनेसाठी निश्चित करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. ही योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येते. या योजनेतील घटकांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या व्हावी म्हणून या अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत आतापर्यंत केवळ भौतिक सुविधांचे निर्माण या घटकांतर्गत लहान बांधकामे व मोठी बांधकामे याच बाबींकडे लक्ष देण्यात आले होते. या अभियानाचा अधिक प्रभावी विस्तार होण्याच्यादृष्टीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास इत्यादी अशा अनेकविध घटकांचा व उद्दिष्टांचा अंतर्भाव होणे आवश्यक असल्याने शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान फायदेशीर ठरेल.

राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे हीदेखील अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात आली आहेत. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा तीन स्तरांवर राबविण्यात येत आहे.

अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना विद्यार्थीकेंद्रीत उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी एकूण ६० गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभागाकरिता एकूण ४० गुण असतील. अभियानात सहभागी शाळांचे तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील गठीत समित्या शाळांच्या कामगिरीच्या आधारे मुल्यांकन करतील.

बृहन्मुंबई महानगरपालिका व वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले २१ लाख, दुसरे ११ लाख व तिसरे पारितोषिक ७ लाख रूपयांचे असेल. उर्वरित महाराष्ट्रात तालुकास्तरावर पहिले ३ लाख, दुसरे २ लाख, तिसरे १ लाख रुपये, जिल्हास्तरावर पहिले ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख तर ८ विभागीय स्तरावर पहिले २१ लाख, दुसरे ११ लाख, तिसरे ७ लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका व वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिका तसेच उर्वरित महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा एकमेकांशी स्पर्धा करुन करतील आणि त्यातून दोन्ही वर्गवारीसाठी राज्यस्तरीय प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येतील.

या अभियानात सहभागी होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शाळांनी सरल प्रणालीतील स्कूल पोर्टलमधील लिंक-https://student.maharashtra.gov.in/stud db/users/login या संकेतस्थळावर माहिती भरावी. अभियानात सहभागी होत बक्षिसे जिंकावीत आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण आयुक्तालय आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासनाने केले आहे.

-संकलन, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे