राज्यातील साकव बांधकामांसाठी १३०० कोटींचा निधी – मंत्री रवींद्र चव्हाण

  • जिल्ह्याच्या विकासासाठी विविध कामे मंजूर
  • दर्जेदार कामे करुन नागरिकांना तक्रार करण्याची संधी देऊ नका

 कोल्हापूर दि. (जिमाका): राज्यातील साकव बांधकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला १३०० कोटींचा निधी देण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत  चिरकाल टिकणारी विकासकामे करा, ही कामे दर्जेदार पद्धतीने करुन कोणत्याही कामाविषयी नागरिकांना तक्रार करण्याची संधी देवू नका, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यात झालेल्या विविध विकासकामांचे आभासी पद्धतीने लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली फित कापून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार अमल महाडिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता संजय पाटील, सत्यजित कदम, महेश जाधव, राहुल चिकोडे, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध विकास कामांची चित्रफित दाखविण्यात आली.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अनेक विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. ‘सारथी’ उपकेंद्राची इमारत व याठिकाणी ५०० मुले व ५०० मुलींचे वसतीगृह, ग्रंथालय बांधकामासाठी १७६ कोटी रुपये, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीसाठी १७४ कोटी, सीपीआर मधील विविध इमारतींच्या दुरुस्तीसाठी 43 कोटी, दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाला 16 कोटी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑडिटोरियम अंतर्गत विविध कामांसाठी 9 कोटी 50 लाख रुपये यांसह अनेक कामांसाठी मंजूरी देण्यात आली असून ही कामे लवकरच सुरु होत आहेत, असे सांगून श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या विकासासाठी १ हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आला असून यालाही शासन स्तरावर मंजूरी देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागात काम करताना राष्ट्रसेवेची संधी समजून उत्तम काम करा, असे आवाहन त्यांनी या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, कोणत्याही भागाचा विकास होण्यासाठी रस्त्यांचे जाळे निर्माण होणे गरजेचे असते. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे मंजूर केली आहेत. जिल्ह्यासह राज्यातील रस्ते दर्जेदार पद्धतीने तयार व्हावेत, यासाठी बांधकाम विभागाकडून भरघोस निधीची तरतूद व्हावी.

वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने शहरांतर्गत रस्तेही चांगल्या पद्धतीने व्हावेत, पुलांची उंची वाढवावी, अशी अपेक्षा माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली.

अधीक्षक अभियंता शामराव कुंभार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या विविध कामांची माहिती दिली. कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव यांनी आभार मानले.

०००