विविध धोरणांच्या माध्यमातून विकास कामांना गती – मंत्री रवींद्र चव्हाण

सांगली दि. (जिमाका) : संपूर्ण देशात पायाभूत सुविधांची कामे गतीने होत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील माणसाला न्याय देण्याचे काम होत आहे. विविध धोरणांच्या माध्यमातून विकास कामांना गती देण्याचे काम शासन करीत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

शासकीय विश्रामगृह आवार मिरज येथे सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचे आभासी पद्धतीने भूमिपूजन व लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, कार्यकारी अभियंता मिलिंद कुलकर्णी, मकरंद देशपांडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध 9 रस्त्यांच्या सुमारे 660 कोटी 41 लाख रूपये किंमतीच्या कामाचे तसेच 8 कोटी 20 लाख रूपये किंमतीच्या इमारती बांधकामाचे भूमिपूजन, 885 कोटी 28 लाख रूपये किंमतीच्या विविध 5 रस्त्यांचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त करताना गत दोन वर्षात‍ सांगली जिल्ह्यात जवळपास 1300 कोटी रूपयांची विविध विकास कामे झाली असल्याचे व काही कामे होत असल्याचे सांगितले.

प्रारंभी दिप प्रज्वलन व सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अधीक्षक अभियंता शामराव कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी सांगली जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. कार्यकारी अभियंता मिलींद कुलकर्णी यांनी आभार मानले.

०००