पोलिसांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. १० (जिमाका):पोलीस दलात भरती होतांना घेतलेली शपथ स्मरून पोलिसांनी शासक म्हणून नाही तर जनतेचे सेवक म्हणून आपले कर्तव्य निभवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२४ च्या समारोप समारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार ॲड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर पोलीस महासंचालक निखील गुप्ता, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक दत्ता कराळे, पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ताणतणावापासून दूर राहण्यासाठी खेळ महत्त्वपूर्ण आहेत. खेळामुळे एक संघभावना तयार होवून आव्हाने पेलण्याची स्फूर्ती व शक्ती मिळत असल्याने खेळाडू प्रत्येक क्षेत्रात आपली चमक दाखवत असतो. यासारख्या क्रीडा स्पर्धांमुळे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत असते, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

विक्रम हे मोडण्यासाठी असतात, अशा स्पर्धांमधील विक्रम मोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या स्पर्धांच्या माध्यमांतून राज्यातील पोलीस दल एक नवा जोश व उत्साह घेऊन जाईल असा आशावाद उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याचे पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून ते आपले कर्तव्य निर्भीड व निस्पृहपणे बजावतात. त्याचप्रमाणे पोलिसांच्या कल्याणासाठी चांगली दर्जेदार घरे उपलब्ध करून देणे, कुटुंबीयांना आरोग्य, शिक्षणाच्या योजना देण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत, नव्या पिढीसमोर असलेले अंमली पदार्थांच्या मोठ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून ही लढाई जिंकण्याचा विश्वास देखील उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला म्हणाल्या, अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्तम आरोग्य राखण्यासाठी मदत होत असते. तसेच वेळोवेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये पोलीस दलाने केलेली उत्कृष्ट कामगिरीबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या पोलीस पथकांच्या संचलनाने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच  पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह देवून सन्मानित केले. यानंतर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी 34 व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप झाल्याचे जाहीर केले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

क्रीडा स्पर्धांचे निकाल….

20 व्या जागतिक पोलिस आणि फायर गेम्स, विनिपेग, कॅनडा येथील पोलिस संघाचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलिस दलाच्या पदक प्राप्त या पोलीस अधिकाऱ्यांचा झाला सन्मान.

कुस्ती प्रकारात सुवर्ण पदक विजेते: सहाय्यक पोलीस आयुक्त नरसिंग यादव, सहाय्यक समादेशक राहुल आवरे, पोलीस उप अधीक्षक विजय चौधरी.

बॉडीबिल्डिंगमध्ये रौप्य व कांस्य पदक विजेते: सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे.

34 व्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा विजेते

हॉकी विजेता संघ : प्रशिक्षण संचालनालय

फुटबॉल विजेता संघ : राज्य राखीव पोलीस बल

महिला संघ : ऑल ओव्हर जनरल चॅम्पियनशीप : वीर जिजामाता शिल्ड – प्रशिक्षण संचालनालय संघ पहिल्या रँकवर तर मुंबई शहर (द्वितीय), पुणे आणि पिंपरी चिंचवड (तृतीय), कोल्हापूर रेंज (चौथा), नागपूर शहर (पाचव्या), अमरावती रेंज (सहाव्या)

व्हॉलीबॉल: नागपूर शहर, कबड्डी : पुणे शहर/ पिंपरी चिंचवड आयुक्तालय

 

पुरूष संघ : कबड्डी : मुंबई शहर, बास्केटबॉल : नाशिक परिक्षेत्र, खो – खो व हँडबॉल : मुंबई शहर, ॲथलेटिक्स : प्रशिक्षण संचालनालय,

उत्कृष्ट नेमबाज (पुरुष) : वाशिम पोलीस अधीक्षक अनुज तारे

ऑल ओव्हर जनरल चॅम्पियनशीप : राज्य राखीव पोलीस बल (प्रथम), प्रशिक्षण संचालनालय संघ (द्वितीय), मुंबई शहर (तृतीय), कोल्हापूर रेंज (चौथ्या), पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड (पाचव्या) तर नाशिक रेंज (सहाव्या).

०००