औद्योगिक अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. १३ : पुणे जिल्ह्यातील तळवडे, पिंपरी चिंचवड, नागपूर जिल्ह्यातील चाकडोह काटोल येथे कारखान्यात स्फोट होऊन अनेक कामगारांचा मृत्यु झाला. मृतांमध्ये महिला कामगारांची संख्या लक्षणीय होती. औद्योगिक विकासात आघाडीवर असणाऱ्या राज्यात अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत.

राज्यात सर्व औद्योगिक कारखान्यांची तत्काळ तपासणी करुन बेकायदेशीर कारखान्यांवर कारवाई करावी. कार्यरत मजुरांना आवश्यक सर्व सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याबाबत सर्व उद्योजकाना सक्त सूचना देण्यात याव्यात, प्रत्येक उद्योग आस्थापनांना त्यांच्या उद्योगामध्ये महिला कामगारांना लहान बाळांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करावा. सर्व कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडिट करावे. सर्व कामगारांना कारखान्यातर्फे विमा संरक्षण पुरविण्यात यावे. अपघातामध्ये मृत व जखमी कुटुंबांचे तत्काळ पुनर्वसन करावे. अपघातग्रस्त कुटुंबांना कारखान्याने तत्काळ आर्थिक मदत करावी.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याची सक्षमपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना संचालक, औद्योगिक सुरक्षा यांना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.