नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या १८८६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता

मुंबई, दि. १५: नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी १८८६.९१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी महानगर प्रदेशातील २५ गावांकरीता अमृत टप्पा दोन मधून मलनिस्स:रणासाठी सुमारे ७१६ कोटी खर्चाच्या वाहिनीच्या कामाचा समावेश आहे. ही विकासकामे जलदगतीने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, एनएमआरडीए आयुक्त मनोज सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील दक्षिण ब आणि पूर्व अ या भागातील सुमारे २५ गावांमधील मलनिस्सारणाकरिता ५०० किमी लांबीची मलनिस्सारण वाहिनी अमृत टप्पा २ मध्ये मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमध्ये चार मलनिस्सारण प्रकल्प आणि एक पंप हाऊस यांचा समावेश आहे.

आज झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या १८८६.९१ कोटीच्या अंदाजपत्रकात कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा तीर्थक्षेत्र विकास टप्पा ३, दीक्षाभूमी विकास, कर्करोग रुग्णालय, हिंगणा क्षेत्रातील मुलभूत सुविधा, पूर मदत निधी, रस्ते विकास, प्रधानमंत्री आवास योजना, श्री क्षेत्र धापेवाडा येथे मलनिस्सारण केंद्राचे बांधकाम, पर्यटन विकास यासारख्या विकास कामांचा समावेश आहे.

००००