गोदा आरतीसाठी नाशिक प्रशासनाला राज्य शासनाकडून ११ कोटी ७७ लाख रुपये वितरित – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १७ :  वाराणसी, ऋषिकेश व हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरती प्रमाणेच दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या आणि श्री रामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक येथील पवित्र गोदावरी नदीच्या आरतीचा देखिल कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली होती. या गोदा आरती उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठीचा ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला आज वितरित करण्यात आला.

ही कार्यवाही  जलद गतीने व्हावी यासाठी एक स्थानिक समिती गठित करण्यात येऊन मुंबई आणि नाशिक येथे संबंधितांसोबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी बैठका घेतल्या होत्या.

जिल्हाधिकारी नाशिक यांनी त्यानंतर अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देऊन दिनांक 14 फेब्रुवारी रोजी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास तात्काळ मान्यता देत निधी उपलब्ध करून वितरितही करण्यात आला आहे. त्यामुळे आता गोदा आरती साठी आवश्यक पायाभूत सोई सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता पायाभूत सोयींसाठी मागितलेला निधी उपलब्ध झाल्याने गोदा आरतीसाठी अकरा प्लॅटफार्म तयार करणे, भाविकांना बसण्यासाठी गॅलरी, हायमास्ट, तसेच एलईडी आणि विद्युतीकरण आदी कामे वेगाने करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

०००