मुंबई, दि. २२ : बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला नामवंताच्या भेटीसोबत मुंबईकरांनी मोठा प्रतीसाद दिला आहे. जेष्ठ दिगदर्शक राजदत्त, संगीतकार श्रीधर फडके, अभिनेत्री स्मिता तांबे, मनवा नाईक या मान्यवरांनी भेटी देऊन प्रदर्शनाचे कौतुक केले आहे.
या प्रदर्शनात राज्यातील १२५ पेक्षा जास्त लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात खादी, पैठणी, हिमरू शाल, मध, हस्तकला, वारली पेंटिंग्ज, बांबूपासून तयार वस्तू, कोल्हापूरी चप्पल, ज्वेलरी, मसाले इत्यादी दर्जेदार गोष्टीं अत्यंत वाजवी किंमतीत उपलब्ध आहेत. प्रदर्शनातील एक्स्पिरियन्स सेंटरमध्ये प्रत्यक्ष वस्तूंची निर्मिती सुद्धा पाहायला मिळते.
याशिवाय स्वयं सहायता महिला बचत गटाच्या खाद्य पदार्थांची मेजवानी, विविध प्रांतातील स्वादिष्ट व रुचकर पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल देखील या प्रदर्शनात अनुभवता येते.
या प्रदर्शनाला आतापर्यंत हजारो मुंबईकरांनी भेटी दिल्या आहेत.
हे प्रदर्शन २५ फेब्रुवारी पर्यंत बी के सी येथील एमएमआरडीए ग्राऊन्ड वर आहे. मुंबईकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले आहे.
०००
मनीषा सावळे/विसंअ/