भटक्या विमुक्त जाती -जमातीतील नागरिकांना आधार कार्ड देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
8

मुंबई, दि. २२ : भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना जन्म दाखला, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, आयुष्यमान भारत आरोग्य पत्रिका देण्याबाबत कार्यवाही करावी. या समाजातील नागरिकांना आधारकार्ड देण्याबाबत महिनाभरात प्राधान्यक्रमाने शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश महसूल, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिले.

भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली. याप्रसंगी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रफुल्ल ठाकूर आणि भटके विमुक्त विकास परिषदेचे पदाधिकारी हजर होते. तसेच  सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. सावे म्हणाले, भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना  विविध दाखले व प्रमाणपत्र मिळण्यासाठी विविध शासकीय विभागांमार्फत निर्देश झालेले आहेत.

या समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी प्रामुख्याने जन्म दाखला, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, आयुष्यमान भारत आरोग्य पत्रिका,  जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र यांची गरज असते ते मिळताना विविध समस्या व अडचणींचा सामना करावा लागतो.  हे टाळण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.

भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरीकांना आधार कार्ड देण्याबाबत माहिती व तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) यांनी क्षेत्रिय स्तरावर सुचना दिलेल्या आहेत तसेच या अनुषंगाने विशेष मोहिम राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना  कळविण्यात आले आहे.

भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरीकांना शिधापत्रिकाचे वितरण व्हावे यासाठी विशेष मोहिम राबविण्याकरिता  अन्न व नागरी पुरवठा विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड व सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी दिली.

०००

किरण वाघ/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here