नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.२३ (जिमाका) : नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्यावतीने शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते दिग्रस तालुक्यातील २ हजार ५०० नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे, पराग पिंगळे, राजकुमार वानखडे, उत्तम ठवकर, राहुल शिंदे, मिलिंद मानकर, रमाकांत काळे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये पुर्वी कामगारांना पेटीचे वाटप करण्यात येत होते. या पेटीचा फारसा उपयोग होत नसल्याने गृहोपयोगी साहित्य वाटपाची योजना सुरु करण्यात आली. या साहित्याच्या संचात १७ प्रकारच्या ३० साहित्याचा समावेश आहे. या वस्तू उत्तम दर्जाच्या व उपयुक्त अशा आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

अनेक कामगारांनी नोंदणी केली परंतू नंतर नोंदणीचे नुतनीकरण केले नसल्याने त्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. अनेक कामगारांची नोंदणी देखील झाली नाही. नुतनीकरण व नवीन नोंदणीची विशेष सुविधा दिग्रस येथे उपलब्ध करुन देणार आहोत. कामगारांना आता आँनलाईन पद्धतीने थेट लाभ दिला जातो. त्यामुळे लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्यांपासून सावध रहावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे यांनी केले. महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. पराग पिंगळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000