मुंबई, दि.24 : मुंबई शहर जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदार नोंदणी करीता व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.मुंबई शहर जिल्हा कार्यालय आणि लाला लजपतराय महाविद्यालयातील राष्ट्रीयसेवा योजनेच्या वतीने मार्शल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
एअर इंडिया बिल्डिंग, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यत ही मार्शल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सामजिक संस्था मार्क युवर प्रेझेन्स (MYP) सोबत मुंबई शहरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजतील विद्यार्थी,प्राध्यापक विविध विद्या शाखेचे विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी स्वीप नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, मुंबई शहर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक क्रांती इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ही रॅली यशस्वीपणे पार पडली.
मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाही मध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in / Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
लोकशाहीला अधिक समृद्ध करण्यात मतदानाचे महत्त्व आणि युवा वर्गाचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुण मतदारांची नोंदणी संख्या वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रम, निवडणूक साक्षरता याबाबत मतदारांना ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने मतदान नोंदणी प्रक्रियेची व EVM/VVPAT मशीन व Mock Poll कशा पध्दतीने हाताळावे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच नव मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा अधिक सहभाग असेल असे या रॅलीत सहभागी तरुणांनी आश्वासन दिले.
000