‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्सपो २०२४’ ला भरघोस प्रतिसाद

0
16

ठाणे, दि. २६ (जिमाका) : महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्याकरिता एरोस्पेस ॲण्ड डिफेन्स मॅन्युफॅक्चरींग धोरण नव्याने अद्यावत केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. तर सप्लाय चैन वर भर देवून नागपूर, शिर्डी, पुणे व रत्नागिरी या चार ठिकाणी डिफेन्स क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मंत्री उद्योग सामंत यांनी केले. या डिफेन्स एक्पोमध्ये कोकण विभागातील २४ उद्योग घटकांनी आपला सहभाग नोंदविला. या घटकांना कोकण विभागीय उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ, ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती सीमा पवार, रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या, रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक  प्रकाश हणबर आणि पालघर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला आर्थिक बळकटी देण्यासाठी राज्यशासनाच्या उद्योग विभागामार्फत संरक्षण, संशेधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सहकार्याने महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणा-या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी मोशी येथील इंटरनॅशनल एक्झीबिशन ॲण्ड कन्वेनशन सेंटर येथे भरविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्सपो  २०२४’  प्रदर्शनाचे उद्घाटन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफट्नंट जनरल अजय कुमार सिंह, एअर मार्शल विभास पांडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, निबे लिमिटेडचे अध्यक्ष गणेश निबे, कोकण विभागीय उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ हे मान्यवर उपस्थित होते.

डिफेन्स एक्सपोमध्ये डिफेन्स्‍ स्टार्टअप, उद्योजकांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी, संरक्षण क्षेत्राशी निगडीत धोरणे इ. विषयावर चर्चासत्र व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील संरक्षण क्षेत्राशी निगडीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे उत्पादन घेणा-या उद्योजकांचे विविध दालनांमध्ये प्रदर्शन करण्यात आले.

या प्रदर्शनामध्ये ठाणे जिल्हयातील प्रिसीहोल आर्म्स प्रा. लि., डबीर इंडस्ट्रीज, मॅग-5 इनोवेशन्स प्रा. लि., मे. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड, क्रुगर व्हेंटिलेशन इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि., फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडिया, एस.एस. नातू इंजिनियरींग प्रा. लिमिटेड, एच.डी. फायर प्रोटेक्ट प्रा. लिमिटेड, एल फॉण्ड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्कर इक्विपमेंट्स प्रा. लि., स्टॅम्प आयटी सोल्युशन्स प्रा. लि., मेयर इंडस्ट्रीज प्रा. लि., स्टीम एरिट्रिक कंट्रोल इ. 13 घटकांनी सहभाग घेतला तसेच पालघर जिल्हयातून सनराईज इंडस्ट्रीज, ओरिगा मार्केट, पद्मा इंडस्ट्रीज, महालक्ष्मी इंजिनियरींग वर्कस्, साई ल्युमिनस आणि कास्टिंग इ. याशिवाय रायगड जिल्हयातून आहिल प्रॉडक्ट्स कंपनी लि., मे. ॲम्प्ट्रॉनिक्स टेक्नो प्रा. लि., एस.एच.एम. शिप केयर प्रा. लि., सुनील फोर्जिंग आणि स्टील इंडस्ट्रीज, जयश्री गल्वा प्रा. लि., टाटा स्टील लिमिटेड अशा प्रकारे कोकण विभागातून एकूण 24 उद्योग घटकांनी उस्फूर्त सहभाग घेतला. या उद्योग घटकांनी आपल्या उत्पादनांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

या प्रदर्शनातील विविध दालनांना नामांकित उद्योजक, शासकीय अधिकारी, इंजिनियरींग/बी-टेक महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी  भेटी दिल्या. संरक्षण क्षेत्रीतील उद्योगांच्या मागणीप्रमाणे 1 हजार एकर जागा उपलब्ध करुन देण्याचे उद्योग मंत्री  श्री. सामंत यांनी ग्वाही दिली असल्याने व एमएसमई साठी अधिक सुविधा आणि सवलती देण्याचे धोरण स्वीकारण्यात येण्यात असल्याने सर्वच उद्योजकांना आशेची नवीन किरणे जागी झाली आहेत, ज्यामुळे उदयोगांचे विस्तारीकरण व विकास होण्यास मदत होणार आहे.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here