मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

0
9

सांगली दि. २८ (जिमाका) : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी काय काय नियोजन केले जात आहे, याचा आढावा सर्व संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी यांच्याकडून जिल्हा नियोजन समिती सभागृहत घेतला. यावेळी डॉ. राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले की, संबंधित ARO नी मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी यावे यासाठी तरुण, वयोवृद्ध व दिव्यांग तसेच महिला मतदार यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा चांगल्या द्याव्यात, तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांमधे दिव्यांगांसाठी रॅम्प, महिला पुरुष स्वच्छता सुविधा, लाईट, पाणी, निवारा-सावलीची व्यवस्था तसेच मॉडेल मतदान केंद्र याबाबत आवश्यक सूचना केल्या. लोकशाहीमध्ये मतदारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने निवडणूक आयोगाने सर्वसमावेशक निवडणूक प्रक्रियेवर भर दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे सांगून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदार संघामध्ये दिव्यांग, महिला, एकमेवद्वित्तीय अशी आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्याबाबत कार्यवाही करावी.

तसेच जिल्ह्यातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस विभागासोबत भेटीचे आयोजन करुन आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांना मतदार नोंदणीप्रसंगी प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवाव्यात. महिला मतदारांची नोंदणी करुन मतदान जनजागृतीपर मेळावे आयोजित करण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना दिल्या.

मतदार यादीच्या माहितीचे (डाटा) दर आठवड्याला अवलोकन करावे. मतदार नोंदणीच्या अनुषंगाने प्राप्त सर्व अर्ज विहीत मुदतीत निकाली काढावे तसेच प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधीतानी त्याचे निराकरण करावे. मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी त्यातील त्रुटींची पूर्तता करावी. त्याचबरोबर या निवडणुकीत 100 टक्के मतदान करणाऱ्या गावांचा जिल्हा प्रशासनातर्फे यथोचित सन्मान करावा अशी सूचनाही श्री. देशपांडे यांनी केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी लोकसभा निवडणुकीकरिता सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती पीपीटीद्वारे सादर केली तसेच जिल्ह्यात एकूण 2421 मतदान केंद्रे असल्याचे सांगितले.  या पूर्वतयारी आढावा बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

०००

भटक्या विमुक्त जमातीच्या प्रतिनिधींसोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली बैठक

सांगली (जिमाका) दि. २८ : भटक्या जाती -जमातीतील लोक निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहू नयेत, त्याचबरोबर त्यांना निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच त्यांच्या इतर प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीमधील विविध प्रतिनिधी, संघटना व सहाय्यकारी संस्था यांच्याबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली.

यावेळी त्यांना मिळत असलेल्या सोयीसुविधा, विविध ओळखपत्र व मतदान कार्ड याबाबत त्यांनी आढावा घेतला. या समाजाविषयी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. मतदान प्रक्रियेत समावेश होण्यासाठी त्यांना मतदार ओळखपत्राची गरज आहे. त्यांना ते वेळेत देण्यात यावे तसेच त्यांच्या रेशन कार्ड, जातीचा दाखला याबाबतही आढावा घेवून दि. ३ मार्च पासून सर्व्हे सुरु करण्यात यावा, असे निर्देश श्री. देशपांडे यांनी  प्रांताधिकारी यांना दिले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयाधिनी यांनी, गायरान जमिनीवर भटक्या विमुक्त जातीतील लोकांना कायमस्वरूपी निवारा देता येईल का? या बाबत जिल्हा प्रशासनामार्फत कायदेशीर बाबी तपासल्या जातील, असे सांगितले.  तर या जमातीच्या लोकांचा डाटाबेस असण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अनिल मोरे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित भटक्या समाजातील नागरिकांनी त्यांना येणाऱ्या विविध अडचणी श्री. देशपांडे यांना सांगितल्या.

०००

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रयत्न करावेत 

 सांगली  दि. २८ (जिमाका) : देशातील लोकशाहीसाठी तरुण मतदार हा अत्यंत आवश्यक घटक आहे. तथापि, मतदान प्रक्रियेबाबत दुर्दैवाने तो उदासीन राहतो. युवकांनी विशेषता महाविद्यालय युवकांनी मतदान प्रक्रियेत अत्यंत उत्साहाने सामील व्हावे, तसेच हे तरुण निवडणूक मतदान प्रक्रियेत कशा पद्धतीने अधिक सहभागी होतील याबाबत जिल्ह्यातील प्राचार्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सांगली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत आज बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. देशपांडे पुढे म्हणाले की, युथ हे खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेचे आयकॉन असून त्यांचे काउंटिंग व पोलिंग प्रक्रियेत योगदान देण्यात येणार आहे. त्यांच्या या योगदानामुळे तो मतदानाकडे सकारात्मकरित्या पाहू शकेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला .

यावेळी स्वीप अंतर्गत मतदार नोंदणी कामी योगदान देणाऱ्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. गौरविण्यात आलेली महाविद्यालये व विद्यार्थी पुढीलप्रमाणे. उत्कृष्ट महाविद्यालय – पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगांव, बळवंत कॉलेज विटा, श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर, मिरज महाविद्यालय मिरज, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी .

उत्कृष्ट नोडल अधिकारी – डॉ. काकासाहेब भोसले डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर (बुर्ली), डॉ. नेताजीराव पोळ पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय कवठे महांकाळ, प्रा. किरण मधाळे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग सांगली.

उत्कृष्ट कॅम्पस अम्बॅसडर (राजदूत) – कु. मानसी माने, मातोश्री बयाबाई श्रीपतीराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव, शंकर साळुंखे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिराळा, कु. शुभांगी माने राजे रामराव महाविद्यालय जत, अविनाश जगधन कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय सांगली.

उत्कृष्ट जिल्हा समन्वयक – सार्थक कोळेकर, अमन फयाज पटेल, सुयश नरडे, प्रशांत जाधव, कु. राधिका खोत आणि पृथ्वीराज चव्हाण यांना श्री. देशपांडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

०००

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न करावेत 

सांगली दि. २८ (जिमाका) : राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बी.एल.ए. (बुथ लेव्हल एजंट) नियुक्त करणे आवश्यक आहे. मतदार नोंदणी व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी आपापल्यापरीने कसोशीने प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. देशपांडे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कामकाजाबाबत आढावा घेतल्याचे सांगून सर्व यंत्रणा त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले कामकाज व्यवस्थितपणे पार पाडत असल्याचे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचाही सहभागी घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत  निवडणूकीच्या अनुषंगाने येणाऱ्या अडीअडचणीबाबत त्यांनी यावेळी संबंधितांशी चर्चा केली.

०००

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवा

सांगली दि. २८ (जिमाका) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी बँकेतील खात्यावरून होणारे मोठे आर्थिक व्यवहार यावर बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच रेल्वे पार्सल, कुरिअर, चेक पोस्ट आदी ठिकाणी सुक्ष्म तपासणी करावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने इर्न्फोसमेंट एजन्सीची बैठक मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक ‍रितू खोखर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे, जिल्हा परिषद मुख्य वित्त व लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे व्‍यवस्थापक विश्वास वेताळ यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क, जीएसटी, आयकर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशपांडे म्हणाले, आयकर, पोलीस, बँक, जीएसटी, राज्य उत्पादन शुल्क आदी यंत्रणांनी दक्ष राहावे. फ्लाईंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम्स आदी नियुक्त पथकांमार्फत आंतरराज्य सीमा, चेक पोस्ट या ठिकाणी 24×7 निगराणी ठेवावी. निवडणूक कालावधीत कायदेशीर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी भयमुक्त व निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी दिली.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here