सर्वसामान्यांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे ही मुख्यमंत्र्यांची अपेक्षा – उपसभापती डॉ. गोऱ्हे

बारामती दि. ०२: सामान्य लोकांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आज मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या दृष्टिकोनातून उद्योजक आणि प्रशिक्षणार्थी तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या युवकांसोबत कौशल्य, कला, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे संवादाची संधी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध केली जात असल्याचे सांगत विभागाचे अभिनंदन केले. तसेच यापूर्वी देखील विभागाने ठिकठिकाणी असे मेळावे घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या कार्यक्रमात नोंदणीकृत उद्योजक ३४७, अधिसूचित केलेली रिक्त पदे ५५ हजार ७२ म्हणजे एवढी रिक्त पदे विविध कंपन्यांमध्ये असून त्यांना योग्य उमेदवारांची अपेक्षा आहे. उमेदवार नोंदणी ३३ हजार १९ आणि स्टार्टअप स्टॉल २६ अस आजच्या कार्यक्रमामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात पेन्शन योजनेच्या संदर्भात सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर रोजगार, कायदा सुव्यवस्था त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे मेळावे आहेत त्याच्यामध्ये शासन आपल्या दारी सारखा उपक्रम असेल महिला सक्षमीकरण योजना आहे या सगळ्या योजनांच्याबद्दल देखील उहापोह झाला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक व युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी पुणे विभागातंर्गत पुणे, सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींसाठी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन बारामती येथे करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री मंगल प्रभात लोढा, उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच सुनेत्रा पवार, संजय घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

०००