‘ताडोबा भवन’ ठरणार पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 4 : ‘ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात विविध देशाचे प्रधानमंत्री ताडोबा पर्यटनासाठी येतील, असा विश्वास मला आहे. अशावेळी ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला हवे, असा विचार मनात आला. त्यामुळेच 4482 चौ. मीटरमध्ये एक उत्कृष्ट ताडोबा भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ एक साधी इमारत नसेल तर ताडोबा भवन हे पर्यावरणाच्या विद्यापीठाचे चालते-बोलते ज्ञानकेंद्र ठरणार आहे’, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर येथे ताडोबा भवनाच्या नवीन इमारत बांधकामाचे भुमिपूजन कार्यक्रमात वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक)  शोमिता विश्वास, महिम गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनरंक्षक कुशाग्र पाठक, जितेश मल्होत्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशाचे रक्षण करणा-या जवानांना आपण सॅल्यूट करतो, तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्यरत असणा-या वन अधिकारी व कर्मचा-यांना आज सॅल्यूट करण्याची गरज आहे. देशाची सेवा सर्वतोपरी आहे, तशीच वसुंधरेचे रक्षण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा वनविभाग हा देशात सर्वोत्कृष्टच असला पाहिजे. जगायचा आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो पर्यावरणातूनच मिळू शकतो. त्यामुळे ताडोबा भवन हे पर्यावरणाचा आनंद देणारे केंद्र राहील, असे त्यांनी नमूद केले.

मंत्री म्हणाले, ताडोबा भवन हे इको – फ्रेंडली असावे, या इमारतीमध्ये विजेचे बील येता कामा नये, त्यासाठी संपूर्ण इमारत सोलर पॅनलवर करावी. या इमारतीच्या बांधकामासाठी 18 कोटी 8 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, मात्र इतर अत्याधुनिक सोयीसुविधा करण्यासाठी अतिरिक्त 14 कोटी रुपये त्वरीत देण्यात येतील. वनविभागाच्या प्रस्तावांना गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या.

वन विभागात पायाभूत सुविधा उत्तम

वन विभागाच्या इमारती, विश्रामगृह अतिशय उत्तम करण्यात येत आहे. सोबतच संपूर्ण राज्यातील वन कर्मचा-यांच्या निवासी वसाहतीसुद्धा कॅम्पमधून उत्तम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

असे राहील ताडोबा भवन

चंद्रपूर येथील मुल रस्त्यावर असलेल्या क्षेत्र संचालक, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या खुल्या जागेत 18 कोटी 8 लक्ष खर्च करून नवीन ताडोबा भवन बांधण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर 100 आसन क्षमतेचे ऑडीटोरीयम, पहिल्या माळ्यावर उपवनरंक्षक (बफर) आणि उपवनसंरक्षक (कोअर) यांचे कार्यालय तर दुस-या माळ्यावर क्षेत्रीय संचालक यांचे कार्यालय राहणार आहे. याशिवाय संकीर्ण बांधकामामध्ये पेव्हींग ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या कामांचा समावेश आहे.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/