विविध शासकीय योजनांमुळे महिलांची प्रगती – खासदार राहुल शेवाळे

मुंबई दि. ९ : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि अमरहिंद मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ‘महिला कला महोत्सव २०२४ – उत्सव स्त्रीशक्तीचा’ या महोत्सवाचे उद्घाटन ८ मार्च रोजी झाले. विविध शासकीय योजनांमुळे महिलांची प्रगती होत असल्याचे प्रतिपादन खासदार राहुल शेवाळे यांनी केले.

उद्घाटन सोहळ्यास आमदार सदा सरवणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मीनाक्षी खारगे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, अकादमीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष दीपक करंजीकर, सदस्य श्वेता परळकर, अमर हिंद मंडळाच्या कार्याध्यक्ष सीमा कोल्हटकर उपस्थित होत्या.

शासनाकडून महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि त्याचा लाभ घेऊन महिलावर्ग करत असलेली प्रगती, याचा खासदार श्री. शेवाळे यांनी आढावा घेतला.

आपल्या संस्कृतीतील स्त्रियांचे महत्त्व आणि समाजातील त्यांचे योगदान याबद्दल प्रधान सचिव विकास खारगे यांनी आपल्या भाषणातून गौरवोद्गार काढले आणि  कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व अमरहिंद मंडळाचे अभिनंदन केले.

उद्घाटन सोहळ्यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत शिबानी जोशी यांनी घेतली. त्यानंतर  सम्याक कलांश प्रतिष्ठान यांनी शेतकऱ्यांच्या विषयावर भाष्य करणारे “दादला नको गं बाई” हे  विनोदी लोकनाट्य सादर केले.

०००