मुंबई, दि. 11 : कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे भारतातील पहिले कवितांचे गाव प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते रविवारी झाले. विविध कविता प्रकारांतील तसेच विविध कवींच्या कवितांची दालने या ठिकाणी उभारण्याचे प्रस्तावित असून अशी अधिकाधिक दालने होतील यासाठी चाचपणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिली.
‘मराठीतील श्रेष्ठ आणि प्रसिद्ध कवींची आणि त्यांच्या साहित्याची नवीन पिढीला ओळख व्हावी या बरोबरच साहित्य-पर्यटन या प्रकाराला चालना मिळावी, या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
भिलार येथे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव अस्तित्वात आले. याच धर्तीवर उभादांडा येथे भारतातील पहिले कवितेचे गाव साकारण्यात आले आहे. या गावातील दालनाच्या उद्घाटनप्रसंगी कवयित्री श्रीमती अनुपमा उजगरे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक शामकांत देवरे, संस्थेच्या नियामक मंडळाच्या आणि या प्रकल्पाच्या पुस्तक निवड समितीच्या सदस्य श्रीमती रेखा दिघे, पोंभुर्ले येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
बी.सी.झंवर/विसंअ/