अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या बळकटीकरणासाठी राज्यशासन कटिबद्ध- मंत्री आदिती तटकरे

रायगड ‍दि. १२ (जिमाका):  महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांना बळकट करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

कुरुळ येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद रायगड मार्फत आयोजित विविध योजना लाभ, साहित्य वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार महेंद्र दळवी, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शनी मोरे, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तसेच ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 13 हजार मिनी अंगणवाडीचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.  तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याबरोबरच कुटुंबियांची देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना यावेळी दिले. तसेच लेक लाडकी या शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले आहे. पोषण ट्रॅक्टर ॲपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांतमार्फत अंगणवाडीच्या 100 टक्के लाभार्थ्यांची नोंद ऑनलाईन करण्यात येणार असून लाभार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवांची नोंद त्यामध्ये घेता येणार आहे असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले. अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट किट वाटप खेळणी साहित्य इत्यादी वस्तू पुरविण्यात येऊन अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक, बौद्धिक व शारीरिक विकासाला पूरक असे वातावरण ठरवण्यात करण्यात येत आहे. जिल्हा परिषद निधीच्या माध्यमातून देखील महिला, मुली यांना एमएससीआयटी, सायकल वाटप, शिलाई मशीनचा लाभ डीबीटीद्वारे दिला जातो.  त्याचप्रमाणे महिला बचत गटाचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी मसाले चक्की, दळण मशीन, ई-रिक्षा देखील देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी सेविकांना मोबाईल, लेक लाडकी योजना प्रथम हफ्ता धनादेश, अंगणवाडी केंद्राना स्मार्ट किट तसेच महिला बचत गटांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी आमदार श्री. दळवी यांनी मनोगत व्यक्त केले.

०००