बीड, 22(जिमाका): मतदानामुळेच लोकशाही सशक्त होणार. बीड जिल्ह्यात 13 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.
बीड जिल्ह्याचे मतदान चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 मे रोजी होणार असून जिल्ह्यात 21 लाखापेक्षा अधिक मतदार आहेत या सर्व मतदारांना जिल्हाधिकारी यांनी आवाहन करून सांगितले, की मतदानाचा हक्क 13 मे ला रोजी बजावावा.
निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडण्याचा लोकशाहीचा महोत्सव दर पाच वर्षांनी एकदाच येतो. यामध्ये आपले कर्तव्य प्रत्येक सुजाण मतदाराने निभावले पाहिजे.
लक्षात असू द्या सोमवार दिनांक 13 मे
बीडजिल्ह्यात चौथ्या टप्प्यात 13 मे ला निवडणुका होणार असून केवळ निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी शासनाने ही विशेष सुट्टी जाहीर केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा बीडवासियांसाठी कार्यरत असून ही संपूर्ण यंत्रणा विशेष परिश्रम घेत आहे. बीडच्या मतदारांची यात मुख्य भूमिका आहे.
याकाळात सहली/ तीर्थाटन करताना सोमवार दिनांक 13 मे तारीख लक्षात असू द्या. आपल्या तर्जनीला शाई लावण्याची ही संधी गमावू नका. आपले नाव मतदान यादीत आहे का हे तपासावे नसल्यास ते 15 एप्रिलपर्यंत मतदान यादीत आणण्यासाठी ऑनलाइन अथवा ऑफलाइन प्रक्रिया पार पाडून घ्यावी.
39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर झालेल्या असून निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख ही 18 एप्रिल आहे तर नामनिर्देशन करण्याची तारीख 25 एप्रिल पर्यंत आहे. अर्जाची छाननी ची तारीख 26 एप्रिल आणि अर्ज मागे घेण्याची तारीख 29 एप्रिल आहे. मतमोजणी 4 जूनला होणार असून एकूण निवडणूक प्रक्रिया ही 6 जूनला संपणार आहे . तरी मतदानाचा दिवस हा महत्त्वाचा असून मतदान 13 मे ला करून लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
*****