छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका):- लोकसभा निवडणूकीत लोकांनी अधिक संख़्येने मतदान करावे यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया ही जनतेपर्यंत पोहोचावी याउद्देशाने माध्यम प्रतिनिधींशी नियमित संवाद साधण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ‘संवाद सेतू’ हा उपक्रम सोमवार दि.८ पासून राबविला जाणार आहे.
जिल्हा माहिती कार्यालया शेजारी समिती सभागृहात हा उपक्रम दुपारी साडेतीन नंतर सुरु होईल. दर सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस निवडणूक कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येईल,असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी स्वतः अथवा जिल्हा प्रशासनातील व निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ/ नोडल अधिकारी हे आपापल्या कामकाजाविषयी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतील. निवडणूक विषयक विविध विषयांबाबत माध्यमांकडून माहिती घेतली जाईल. हा परस्पर संवादाचा कार्यक्रम असेल अशी संकल्पना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची असून या उपक्रमाला सर्व माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
०००