‘पेडन्यूज’वर बारकाईने लक्ष द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका):-पेड न्यूज हा अत्यंत संवेदनशील विषय असून मिडिया सेंटर व माध्यम संनियंत्रण व प्रमाणिकरण समितीने याविषयावर बारकाईने लक्ष द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

माध्यम संनियंत्रण व प्रमाणिकरण समिती तसेच एक खिडकी सुविधा समिती यांची संयुक्त बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, अर्चना खेतमाळीस, व्यंकट राठोड, उपायुक्त अपर्णा थेटे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, माध्यम संनियंत्रण समितीचे सदस्य आकाशवाणीचे वृत्त विभाग प्रमुख समरजीत ठाकूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख डॉ. दिनकर माने, मनपा चे जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, जिल्हा परिषदेचे संवाद तज्ज्ञ सतिष औरंगाबादकर, कैलास आहेर, सायबर पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार आदी उपस्थित होते. तसेच दुरदृष्यप्रणालीद्वारे तालुकास्तरीय नोडल अधिकारी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की,  पेडन्यूज बाबत संदिग्धता असण्याची शक्यता असते. अशावेळी अधिक बारकाईने व तपशिलात तपासणी करावे. अशा बातम्यांची तात्काळ दखल घेतांनाच, आचारसंहिता भंगाच्या घटना, फेक न्यूज, चुकीची माहिती प्रसार करणे इ. बाबींवर लक्ष ठेवून असे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ आचारसंहिता कक्षाला कळवावे.

एक खिडकी सुविधेतून परवानग्या देतांना सर्व माहिती अर्जदारांना देण्यात यावी. विविध परवानग्यांबाबत सुस्पष्टता हवी. परवानग्या देण्यासाठीचा वेळ निर्धारित करावा. उपलब्ध मैदानांची माहिती संकलित करावी. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य द्यावे आदी सूचना जिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनी उपस्थितांना केल्या.