मुंबई, दि. २६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक–२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील ’३०-दक्षिण मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) रविंदर सिंधू व ’३१-दक्षिण मुंबई’ लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. मुकेश जैन यांनी आज लोकसभा मतदारसंघांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ’३०-दक्षिण मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. या बैठकीला मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात आदी उपस्थित होते. या बैठकीत श्री. सिंधू यांनी निवडणूक खर्च विभागात नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा घेत माहिती जाणून घेतली.
’३१-दक्षिण मुंबई’ लोकसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, समन्वय अधिकारी (आदर्श आचारसंहिता) उन्मेष महाजन, समन्वय अधिकारी (खर्च) राजू रामनानी, तक्रारी व्यवस्थापन निवारण आणि मतदार हेल्पलाईनचे समन्वय अधिकारी राजू थोटे आदि उपस्थित होते. या बैठकीत डॉ. जैन यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांना समूह भावनेने काम करण्याचे आवाहन केले. तसेच अधिकारी- कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कामकाजासाठी सज्ज केल्याबद्दल डॉ. जैन यांनी समाधान व्यक्त केले.
—
शैलजा पाटील/विसंअ/