बीड लोकसभा मतदारसंघात ११ दिव्यांग तर २२ युवा मतदान केंद्र

बीड, दि.5 (जिमाका) बीड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा निहाय एकूण 2355 मतदान केंद्र असणार आहेत. यापैकी 11 मतदान केंद्रांवर दिव्यांग तर 22 मतदान केंद्रांवर युवा मतदान अधिकारी कर्मचारी असणार आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाने मतदानाच्या प्रक्रियेला अधिक सुरळीत आणि व्यापक करण्यासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम आखलेल्या आहेत. या अंतर्गत तरुण मतदारांनी मतदान प्रक्रियेचा भाग व्हावा यासाठी युवा मतदान केंद्र उभारलेली आहेत. दिव्यांग  नागरिकांनाही मुख्य प्रवाहात आणून त्यांनी मतदान प्रक्रियेचा भाग व्हावा यासाठी दिव्यांग मतदान केंद्र नियोजित केले आहे.

दिव्यांग मतदान केंद्रावर 1 मतदान केंद्र अध्यक्ष, 1 सहाय्यक मतदान केंद्र अध्यक्ष व 2 इतर मतदान अधिकारी असे एकूण 4 दिव्यांग अधिकारी, कर्मचारी असतील. असे प्रत्येक तालुक्यात 01 दिव्यांग मतदान केंद्र आहे. असे एकूण 11 मतदान केंद्र बीड लोकसभा मतदारसंघात आहेत.

तसेच बीड लोकसभा मतदार संघातील एकूण सहा विधानसभा मतदार संघात 22 मतदान केंद्र ही युवा (स्त्री/पुरुष) मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येकी 01 तालुक्यात 02 युवा मतदान केंद्र असणार आहेत.  ज्यांचे वय 35 पेक्षा कमी असेल असे नागरिक हे युवा मतदान केंद्र चालवणार आहेत या मतदान केंद्रातही 1 मतदान केंद्र अध्यक्ष, 1 सहाय्यक मतदान केंद्र अध्यक्ष 2 इतर मतदान अधिकारी असे 4 युवा (स्त्री/पुरुष) मतदान अधिकारी कर्मचारी असणार आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक लोकसंख्या अधिक असून यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनात परदानशीन बुथ् उभारण्यात आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक बुथवर एक महिला सहाय्यक अधिकारी असणे आवश्यक आहे. याप्रमाणे गेवराई विधानसभा मतदारसंघात  27, माजलगाव विधानसभा मतदार संघात 48, बीड विधानसभा मतदारसंघात 136, आष्टी विधानसभा मतदारसंघात 26, केज (राखीव) विधानसभा मतदारसंघात 39, परळी विधानसभा मतदारसंघात 42 असे एकूण 318 परदानशीन बुथ उभारण्यात आलेले आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ आहेत. गेवराई विधानसभा मतदारसंघात 397 मतदान केंद्र, माजलगाव विधानसभा मतदारसंघात  379,  बीड विधानसभा मतदारसंघात 382, आष्टी विधानसभा मतदारसंघात 440, केज विधानसभा मतदारसंघात 415, परळी विधानसभा मतदारसंघात 342 असे एकूण 2355 मतदान केंद्र बीड लोकसभा मतदारसंघात असणार आहेत.

0000