मुंबई उपनगर, दि. 6 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये उमेदवारांचा निवडणुकीचा खर्च भारत निवडणूक आयोगाच्या नियम व अटींप्रमाणेच झाला पाहिजे, असे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च), सुरजकुमार गुप्ता यांनी दिले आहेत.
लोकसभेच्या मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघाकरिता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून श्री. गुप्ता यांची नियुक्ती झाली असून ते 25 एप्रिल 2024 रोजी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई उत्तर-मध्य अंतर्गत येत असलेल्या विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला (अनु.जाती), कलिना, वांद्रे (पूर्व) आणि वांद्रे (पश्चिम) या सहाही मतदार संघांना श्री. गुप्ता यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या.
उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेटीसाठी उपलब्ध राहणार
सध्या श्री. गुप्ता यांचा मुक्काम आणि कार्यालय वांद्रे येथील इंडियन ऑईलच्या विश्रामगृहात असून त्यांना भेटण्याची वेळ जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात दुपारी १ ते २ अशी ठेवण्यात आली आहे. श्री. गुप्ता यांनी मुंबई उत्तर-मध्य २९ मधील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. निवडणुकीच्या कामकाजाबाबत त्यांनी माहिती घेऊन होत असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून मार्गदर्शनही केले. निवडणुकीचे कामकाज नियमाप्रमाणे व्हावे यासाठी त्यांनी मुंबई उत्तर-मध्यच्या सर्व मतदारसंघांना व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यालयांना भेटी देऊन कामकाज आणि त्याबाबतच्या नोंदी नियमाप्रमाणे होत असल्याबाबत खात्री करून घेतली आहे.
बँक खात्यांतील नोंदीबाबतही सजग राहण्याच्या सूचना
उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज दाखल केले असल्याने उमेदवारांच्या खर्चाची तपासणी तसेच त्यांच्या बँक खात्यांतील नोंदीबाबतही सर्व संबंधितांनी सजग राहण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या आहेत.
0000