१०४ वर्षांच्या आजीबाईंनी बजावला गृह मतदानाचा हक्क

0
15

मुंबई दि. १३ :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी 85 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय देण्यात आला होता. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातील 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात आज गृहमतदान पार पडले. आयुष्याची शंभरी पार केलेल्या 104 वर्ष वयाच्या श्रीमती लक्ष्मी राजपूत या आजीबाईंनी दहिसर पश्चिम येथे आज गृहमतदानाचा हक्क बजावला. अत्यंत जबाबदारीने या आजीबाईंनी त्यांचे कर्तव्य पार पाडून इतर मतदारांकरिता आदर्श निर्माण केला आहे. गृहमतदान प्रक्रियेमुळे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान पूर्णतः अडचणमुक्त आणि सुरळीत झाले आहे. 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाकरिता एकूण 68 नोंदणीकृत पात्र मतदार आहेत. यापैकी एकूण ६५ नोंदणीकृत पात्र मतदारांनी आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.

 

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट 26- मुंबई उत्तर मतदारसंघात समाविष्ट विधानसभेच्या 153-दहिसर मतदारसंघात गृहमतदानासाठी 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांनी नोंदणी केली होती. त्यातील आज जे मतदार मतदान करू शकले नाहीत, ते 16 मे 2024 रोजी मतदान करू शकणार आहेत.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वसमावेशकतेला चालना देण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या महत्वपूर्ण उपक्रमानुसार, १५३ दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये ८५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी  व दिव्यांगांसाठी घरगुती मतदान यशस्वीरित्या पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र मतदाराला गतिशीलतेच्या समस्या किंवा वयाबाबतच्या आव्हानांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांना पार करून त्यांच्या लोकशाही अधिकाराचा वापर करता येईल हे निश्चित करण्याचा हा प्रयत्न आहे.

लोकसंख्येच्या महत्त्वपूर्ण भागासाठी निवडणुकीतील सहभाग अधिक सुलभ, सर्वसमावेशक आणि न्याय बनणार आहे. जिल्हा निवडणूक प्रशासन, 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी अतुल सावे, दहिसरचे नायब तहसीलदार बालाजी फोले यांनी ही गृहमतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियोजन केले.

मतदार आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या सोयीप्रमाणे आणि वेळेप्रमाणे प्रशासनाने नियोजन करुन ही गृहमतदान प्रक्रिया पार पाडली. क्षेत्रीय अधिकारी दिनेश सावंत, मतदान अधिकारी सुभाष डुबे, सहायक मतदान अधिकारी आनंद कोळेकर यांच्यासह गिरीश खानविलकर आणि केतन गुजर यांनी प्रत्यक्षपणे संबंधित मतदारांच्या घरी जाऊन ही मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here