दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये १३३३ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

मुंबई, दि. १५: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी च्या पाचव्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने निवडणूक विषयक अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात पार पडले. या दोन दिवसीय प्रशिक्षणात 1333 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

येत्या 20 मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी चारही लोकसभा मतदार संघांतर्गत मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील दहिसर विधानसभा मतदारसंघात क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले. हे प्रशिक्षण दहिसर पश्चिम येथील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले.

प्रशिक्षण सत्राचा उद्देश मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना निवडणुकीसंबंधित आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करून निवडणुकांचे निर्विघ्न आणि विनाविलंब संचालन सुनिश्चित करणे हे होते. प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रिया, मतदार पडताळणी, मतदार व्यवस्थापन, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट  मशीनचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि संकट व्यवस्थापन इत्यादी विषय अंतर्भूत होते. दिनांक 14 आणि 15 मे या 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण 1333 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

अधिकाऱ्यांना प्रशिक्षणामार्फत प्रदान केलेल्या ज्ञानाचे कितपत आकलन झाले हे ऑनलाईन परीक्षेद्वारे पडताळण्यात आले. या प्रशिक्षणासाठी उपस्थितांनी सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना निवडणूक व्यवस्थापनाबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली.