मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई

मुंबई, दि. १९ : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी २० मे, २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० वा. दरम्यान मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

श्री. यादव म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण २५२० मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन दक्ष आहे.

मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मतदारांना मज्जाव करण्यात आला आहे. मतदारांना मतदान केंद्रापासून १०० मीटर बाहेर मोबाईल ठेऊन मतदान करण्यासाठी जावे लागेल, असे श्री. यादव यांनी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/