पशुधनाचे ईअर टॅगिंग १ जूनपासून बंधनकारक

0
12

कोरोनानंतर सार्वत्रिक साथीचे आजार समाजासाठी आव्हान ठरत आहे. मनुष्य प्राण्यांसोबत पशुंनाही साथीच्या आजाराची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था उपलब्ध करताना नोंदणी अभावी कोणतेही पशुधन वंचित राहू नये यासाठी आधार कार्ड च्या धरतीवर पशुंसाठी ईअर टॅगिंग केले जात आहे. सुदृढ, निरोगी व उपयोगी पशुधनासाठी १ जून पासून प्रत्येक पशूचे ईअर टॅंगिंग आवश्यक करण्यात आले आहे. जनावरांची खरेदी विक्री करताना देखील ही बाब आवश्यक करण्यात आली आहे. याची समस्त शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

 

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी. संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने, एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेवून उपाययोजना करणे, पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्यादृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात येत्या 1 जून 2024 पासून तर ईअर टॅग शिवाय पशुधनाची खरेदी-विक्री बंद करण्यात येणार आहे. पशुंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यातून देय होणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत  याचाही यात समावेश करण्यात आला आहे. याबाबत पशुपालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सर्व पशुपालकांना नियमीतपणे करण्यात येत आहे.

पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम-2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व पशुधनास ईयर टॅगिंग करणे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक केले आहे. बाजारात विक्रीसाठी  येणाऱ्या सर्व पशुधनास ईअर टॅगिंग करणे गरजेचे आहे.  दिनांक 1 जून 2024 पासून तर ईअर टँग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समिती घेणार आहे.

1 जून 2024 नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था,दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाई रक्कम देय होणार नाही. राज्यातर्गंत विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणाऱ्या राज्यातील पशुधनास ईअर टॅगिंग केल्याचे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात्री करूनच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाहतुक प्रमाणपत्र द्यावे. पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय ती करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर कार्यवाही होवू शकते. राज्यात विक्रीसाठी येणाऱ्या राज्याबाहेरील प्रत्येक पशुनास ईअर टॅगिंग केले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी या पशुधनास ईअर टॅगिंग करुन घ्यावी. तसेच त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी. 1 एप्रिल 2024 पासून बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय बंद आहे. तसेच 1 जून 2024 पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधन बाजारसमित्यामध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्वरीत अद्ययावत करुन घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकांची राहील. ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्यावर ईअर टॅगिंग क्रमांक नमूद करण्यात येणार आहे.

०००

  • अलका पाटील, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here