मुंबई, दि. ४ : राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामार्फत जारी करण्यात आली आहे. यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून निवडणूक लढविली गेल्यास 25 जून 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1)(कार्यभार) व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सह सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मेघना तळेकर किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मोहन सदाशिव काकड यांच्यापुढे दि. 13 जून 2024 पर्यंत सार्वजनिक सुटी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कक्ष क्रमांक 145, पहिला मजला, विधानभवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई-400032 येथे नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्र याच ठिकाणी व याच वेळेत मिळू शकतील.
नामनिर्देशन पत्रांची छाननी 14 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा ती सूचना देण्याचे लेखी अधिकार उमेदवाराकडून देण्यात आलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकामार्फत किंवा त्याच्या निवडणूक एजंटला वर उल्लेख केलेल्या अधिकाऱ्यास त्यांच्या कार्यालयात 18 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल. तसेच निवडणूक लढविली गेल्यास 25 जून 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1)(कार्यभार) व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी कळविले आहे.
०००
बी.सी.झंवर/विसंअ/