शेतकऱ्यांना ५६ कोटीहून अधिक वीज बील सवलतीचा लाभ प्रदान उर्वरित सर्व शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड, दि. 14 (जि. मा. का.) :-   शासनाने जिल्हयात दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर केल्याने शेतकऱ्यांना आतापर्यंत 56 कोटी 80 लाख रुपये वीज बिल सवलत दिली. यातून वंचित राहिलेल्या 36 हजार शेतकऱ्यांना हा लाभ देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याची पूर्तता करण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले.

जिल्ह्यातील वीज वितरण व अनुषंगिक बाबींचा आढावा पालकमंत्री यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीत घेतला. या बैठकीस माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी अभियंता एम. डी घुर्मे, कार्यकारी अभियंता अ.ना.पाटील तसेच इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात यावर्षी दोन्ही हंगामात पावसाअभावी पिकांची स्थिती खराब राहीली असल्याने शासनाने संपूर्ण बीड जिल्हा दुष्काळ सदृश्य स्थितीचा जिल्हा घोषित केला. यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना 33 टक्के वीज बिल माफीचा निर्णय शासनाने घेतला होता.

जिल्ह्यात असलेल्या एक लाख 83 हजार 282 कृषी जोडण्यापैकी 1 लाख  47 हजार शेतकऱ्यांना दर तिमाही 28 लाख 40 लाख याप्रमाणे सवलत प्रदान करण्यात आली आहे. दोन तिमाही एकूण 56 लाख 80 हजाराची सवलत शेतकऱ्यांना मिळाली आहे.

उर्वरित 36 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना लाभ द्यायचा बाकी आहे. शासन याबाबत सकारात्मक आहे. व हा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना त्वरित देण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले

आजच्या बैठकीत वीज वितरण कंपनीच्या वाहिनी विलगीकरण तसेच जुन्या तारा बदलणे, रोहित्र बदलणे या नियमित कामासह दुष्काळ सदृश्य स्थितीत दिला गेलेला लाभ व कृषी वीज पुरवठ्यासाठी जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या तरतुतीतील कामांचा आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यात विद्युत वाहिनी पुनर्गठण अर्थात आरडीएसएस अंतर्गत विविध कामे प्रस्तावित आहेत. या कामांचा आढावा घेताना ही कामे गतिमान व कालबद्ध पद्धतीने उद्दिष्ट ठरवून पूर्ण करण्याच्या सूचना श्री मुंडे यांनी यावेळी केल्या.

विविध तालुक्यात वीज मंडळाचे काम करणाऱ्या बाह्य यंत्रणांची संख्या कमी आहे यामुळे त्वरित खंडित वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नाही हे लक्षात घेऊन विभागनिहाय या यंत्रणांची संख्या वाढवून त्वरित सेवा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून वीज वितरण कंपनीने पावले उचलावित. असे पालकमंत्री म्हणाले.

कृषी पंप जोडणी जिल्ह्यात आजमितीस कृषी पंपासाठी वीज पुरवठा मागणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 4770 आहे. ही जोडणी मार्च अखेर पूर्ण होणे अपेक्षित असले तरी याला गती देऊन ही सर्व जोडणी डिसेंबर 2024 पूर्वी पूर्ण करा अशा प्रकारचे निर्देश श्री मुंडे यांनी यावेळी दिले.

शेतकऱ्यांना दिवसा आठ तास व रात्री दहा तास विद्युत पुरवठ्याचे लक्ष समोर ठेवून कामे करा व त्या सर्व कामांना गती द्या, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.

कृषी पंप जोडणीतील काही पुरवठा प्रकरणे सौर विद्युत द्वारे पुरवठा झाल्यास सर्व शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. या सर्वांसाठी पाठपुरावा करून कामे करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले.

ज्या कामासाठी वीज वितरण कंपनीचा निधी उपलब्ध नाही ती कामे होण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तरतूद करण्यात येते. या मधून होणारी कामे देखील कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा अशा सूचना श्री मुंडे यांनी यावेळी दिल्या.

                                                             *******