ठाणे, दि. 15 (जिमाका) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार, दि.26 जून 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00 ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातीलर उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2024 च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारसंघांकरिता मतदान करण्याची वेळ बुधवार, दिनांक. 26 जून 2024 रोजी सकाळी 8.00 ते सायं 4.00 अशी निश्चित करण्यात आली होती. परंतू आता भारत निवडणूक आयोगाने दिनांक 03 जून,2024 रोजीच्या पत्रकान्वये लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 56 नुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या बुधवार, दि.26 जून 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00 ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून दिनांक 26 जून,2024 रोजी पदवीधर व शिक्षक मतदारांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी केले आहे.
000000