शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी योग आवश्यक – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0
7

नागपूर, दि.21 : मानवी जीवनात योगासनाचे अनन्यसाधारण महत्व आहे.  निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी तसेच शारीरिक व मानसिक सुदृढ आरोग्यासाठी नियमितपणे योगसाधना करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

            महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन धंतोली स्थित यशवंत स्टेडियम येथे करण्यात आले होते. यावेळी श्री.गडकरी बोलत होते.

आ. टेकचंद सावरकर, आ. कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त अजय चारठानकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख रामभाऊ खांडवे, प्रसिद्ध आहारतज्ञ जगन्नाथ दीक्षित यांच्यासह मोठ्या संख्येने योग अभ्यासक, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

            श्री. गडकरी पुढे म्हणाले की, आजची आपली जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे. आज प्रत्येकाला ताण-तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये योगसाधनेचा समावेश करणे आवश्यक आहे. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आरोग्य सुदृढ राहते. नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगामुळे मन:शांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने निरोगी जीवन जगण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक आहे. योगाच्या माध्यमातून आज रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

तत्पूर्वी, कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी योगासनाची लक्षवेधक सामूहिक प्रात्यक्षिके सादर केली. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रमुख रामभाऊ खांडवे यांनी निरोगी जीवनासाठी योगाचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व विशद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी तर आभार क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांनी मानले.

क्रीडापटूंचा सन्मान

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा यावेळी सन्मान करण्यात आला. वैभव श्रीरामे, हर्षल चुटे, छकुली सेलोकर, तेजस्विनी खिंची, यज्ञेश वानखेडे, खुश इंगोले, वैभव देशमुख, रचना आंबुलकर, अलिशा गायमुखे, ओम  राखडे, प्रणय कंगाले, श्रावणी राखुंडे, निसर्गा भगत, मृणाली बानाईत, श्रीराम सुकसांडे या जिल्ह्यातील क्रीडापटूंना श्री. गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

                                                                        ******

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here