मुंबई, दि. २४ : विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात आपले करिअर करता यावे तसेच रोजगारक्षम संस्थांना कौशल्याधिष्ठीत मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या (MSSU) माध्यमातून विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी 30 जून 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि इतर विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविणे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्याचे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या विद्यापीठात बीबीए, पदव्युत्तर पदवी, सायबर सिक्युरिटीमध्ये व बांधकामातील मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज इत्यादी अभ्यासक्रम शिकविले जातात. या अभ्यासक्रमांसाठी 30 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्याची मुदत देण्यात आली असून 1 जुलै 2024 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असेही कुलगुरू डॉ. पालकर ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सांगितले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. 25, बुधवार दि. 26 आणि गुरूवार दि. 27 जून 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 26 जून 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स- https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
०००