राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश भाग-२ च्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन; ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांचे व छायाचित्रांचे प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
16

कोल्हापूर दि. 26 (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लोकाभिमूख कामासाठी त्यांना भारतरत्न मिळावा अशी सर्व स्तरावरून मागणी होत आहे. यासाठी आपण राज्यशासनाकडून केंद्र शासनाकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणेसाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी सांगितले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शाहू महाराजांचा जीवनपट उलगडणाऱ्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रांचे व छायाचित्रांचे प्रदर्शन दि. २६ ते ३० जून दरम्यान शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन पुरातत्व विभागाच्यावतीने भरविले आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक विधान, महाराजांचे राज्यारोहन, शाहू कालीन पत्रव्यवहार, शाहू महाराजांनी दीन-दुबळ्यांसाठी, समाजाच्या उद्धारासाठी केलेले कार्य, शाहू महाराजांचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला, क्रीडा व अन्य विविध क्षेत्रातील कार्य, प्रशासकीय आदेश तसेच महाराजांनी राज्यकारभार करताना वेळोवेळी घेतलेले निर्णय यांची महत्त्वाची निवडक कागदपत्रे प्रदर्शनात ठेवली आहेत. त्याचबरोबर शाहूकालीन दुर्मिळ छायाचित्रेही लावण्यात आली आहेत.

या कार्यक्रमावेळी राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश भाग-२ च्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीमध्ये झाले. पालकमंत्री मुश्रीफ यांनी आपल्या मनोगतामध्ये शाहू महाराजांविषयी बोलताना त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. शाहू महाराजांनी कमी कालावधीत लोकांच्या साठी अफाट कार्य करून लोककल्याणकारी निर्णय घेतले. देशात अनेक राजे झाले पण आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या पालख्या आजही वाहतो. याचे कारण त्यांनी लोकोपयोगी केलेले काम आणि त्यांनी दिलेले योगदान होय. म्हणून आजच्या पिढीला पुस्तक रूपातून आणि वेगवेगळया प्रसिद्धीच्या माध्यमातून त्यांच्या विचारांची जनजागृती केली पाहिजे. प्रशासनामार्फत पुढिल वर्षभर १५० व्या जयंती उत्सावाबाबत वेगवेगळ्या कार्यक्रमातून शाहू महाराजांचे आदर्श विचार जनतेसमोर ठेवण्याचे नियोजन केले आहे.

प्रास्ताविक संचालक सुजितकुमार उगले यांनी केले. ते म्हणाले, राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश भाग-२ मध्ये २५० पेक्षा अधिक ठरावांचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. कोल्हापूरला समृद्ध म्हणून ओळखले जाते. त्याची खऱ्या अर्थाने सुरूवात शाहू महाराजांनी पूर्वीच्या काळी केली आहे. त्यांनी विभागाच्या कामकाजाविषयक पुढे माहिती दिली. यावेळी महानगरपालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तीकेयन एस., अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पुराभिलेख विभागाचे संचालक सुजितकुमार उगले, सहायक संचालक सायली पिपळे, सहायक संचालक दिपाली पाटील, सहायक संचालक महेश पाटील आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन सहायक संचालक दिपाली पाटील यांनी केले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here