विधानसभा लक्षवेधी

धामणा कारखान्यातील स्फोटप्रकरणी मृत कामगारांच्या वारसांना अधिक मदत देण्याबाबत विचार करणार – कामगारमंत्री सुरेश खाडे

मुंबई, दि.२९ : नागपूर जिल्ह्यातील धामणा (तुरागोंदी) येथील चामुंडी एक्सप्लोसिव्हज या कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना संबंधित कंपनी व्यवस्थापनामार्फत २५ लाख आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक मदत देण्याबाबतच्या मागणीवर राज्य शासन निश्चित विचार करेल, अशी माहिती कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनधिकृत कारखान्याची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

याबाबत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. खाडे म्हणाले की, दि. १३ जून २०२४ रोजी या कारखान्यात फटाक्यांच्या वातीचे पॅकिंगचे काम सुरु असताना आग लागली व स्फोट झाला. या घटनेमध्ये ९ कामगार गंभीररित्या भाजले. त्यापैकी ५ कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला व उर्वरित ४ जखमी कामगारांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या इमारतीमधील स्पिनिंग विभागात तयार होणाऱ्या फटाक्याच्या वाती पॅकिंग विभागात आणून त्या आवश्यक लांबीमध्ये कापून या वार्तीचे बंडल तयार केले जातात. ज्वलनशील असलेल्या फटाक्याच्या वातींचे बंडल प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून या पिशवीचे इलेक्ट्रिक सीलिंग मशीनद्वारे पॅकिंग सुरु असताना ज्वलनशील फटाक्याची वात गरम सीलिंग मशीनच्या संपर्कात आल्याने तेथे आग लागली. ही आग, लगतच असलेल्या पोर्टेबल मॅगझिन रुममध्ये पसरल्याने गन पावडरच्या ५० किलोचा साठा असलेल्या डब्यांमध्ये स्फोट झाला. संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सध्या हा कारखाना बंद करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य अनिल देशमुख, यामिनी जाधव, विश्वजित कदम, राम कदम, अस्लम शेख, जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले यांनी सहभाग घेतला.

 

००००

 

दिपक चव्हाण/विसअं