ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०८ :  इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागस प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुंबई शहरचे सहायक संचालक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

उच्च शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्षासाठी 15 जुलै 2024 पर्यत अर्ज करता येणार असून निवड यादी 1 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर होईल. उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार असून 2 सप्टेंबर 2024 रोजी निवड यादी जाहीर होईल. या योजनेकरिता निश्चित करण्यात आलेल्या अटी शर्तीनुसार लाभार्थी निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

शासकीय वसतिगृहामधून प्रवेश अर्जाची पी.डी.एफ. आवश्यक त्या प्रतीसह सहायक संचालक कार्यालयात सादर करावी. विद्यार्थ्यांनी अर्जासोबत बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक संलग्न करुन गृहपालाकडे सादर करावा.  विद्यार्थी 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. त्यांना किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक राहील. विद्यार्थी वसतिगृहास प्रवेशास पात्र असावा. विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न  २.५० लाख पेक्षा जास्त नसावे.

विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील हा विद्यार्थी रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र (नोटरी), स्वयंघोषणापत्र (दिलेली महिती खरी व अचूक असल्याबाबत),कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र,भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिट्ठी व भाडे करारपत्र/करारनामा,महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अधिक माहिती पत्त्यावर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांचे कार्यालय प्रशासकीय इमारत, भाग-१ चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई ४०००७१ या पत्त्यावर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ