देवस्थानांच्या ठिकाणी पर्यटक व भक्तांना स्वच्छतागृहे, स्नानगृहे उपलब्ध करुन देण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई, दि. 12 : सोलापूर, पंढरपूर येथील देवस्थाने तसेच पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री व एकवीरा देवस्थानाच्या ठिकाणी पर्यटक तसेच सर्व भक्तांना स्वच्छतागृहे, स्नानगृहे, उपलब्ध करुन द्यावीत. याबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

विधान भवन येथील दालनात पुणे विभागांतर्गत सोलापूर, पंढरपूर येथील देवस्थाने व पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री, एकवीरा देवस्थानाच्या पुरातत्व विभागाकडे प्रलंबित प्रश्नाबाबत बैठक झाली.

यावेळी सांस्कृतिक कार्य उपसचिव श्री. विलास थोरात, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार मधुसूदन बर्वे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर, तसेच देवस्थान समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पंढरपूर येथील देवस्थानाच्या विकासकामासाठी आर्किटेक्टमार्फत तयार करण्यात आलेल्या सविस्तर विकास अहवालानुसार येथील देवस्थानांना सुशोभित करावे. भक्तांसाठी स्कायवॉक, दर्शन मंडप यासारख्या सुविधा देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पर्यटन विभागाला पाठवावा. पर्यटन व यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांना उंचावरुन यात्रा पाहण्यासाठी उंचे मनोरे उभे करणे आवश्यक आहे.  याबाबतचा प्रस्ताव मंदिर समितीने पाठवावा.

एकवीरा देवस्थान आणि परिसरात असलेले अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच येथील देवस्थानाच्या पायऱ्यांची व आवश्यक ठिकाणांची दुरुस्ती करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पक्की गटारे बांधावीत. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये, बैठक व्यवस्था, चप्पल स्टँड यांचीही व्यवस्था करण्यात यावी.

लेण्याद्री देवस्थान येथे संदर्भात सविस्तर बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

तसेच सर्व देवस्थांनाना भेटी देणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर सौर ऊर्जा, सीसीटीव्ही, लाईट यांचेही नियोजन करण्यात यावे. तसेच सर्व भक्तांना संकेतस्थळावर आधारित यंत्रणेद्वारे प्रसाद उपलब्ध करुन द्यावा.