‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

मुंबई, दि. १२ : रोजगार निर्मिती करून देश प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका वर्षात ५० लाख रोजगार निर्मितीचा संकल्प केला आहे. रोजगार वाढीसाठी केंद्र सरकारच्या या निर्णयावर आधारित राज्यात मुख्यमंत्री   एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि कौशल्य विकास विभागामार्फत  ग्रामीण व शहरी रोजगार निर्मिती वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’  सुरू केली जात आहे.

राज्यातील युवकांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होऊन  रोजगार मिळण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेचा शनिवार, दि. १३ जुलै २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. गोरेगावमधील नेस्को प्रदर्शन मैदान येथे १३ जुलै रोजी सायंकाळी  ५.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, युवकांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरी व्यवसायाच्या शोधात असतात. युवकांना व्यवसाय व नोकरी प्राप्त करण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त व्हावे, यासाठी शासन त्यांच्यासोबत आहे. १२ वी उत्तीर्ण, आयटीआय व पदविका उत्तीर्ण, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्ण यामधील युवकांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. उद्योजक आणि बेरोजगार युवकांमध्ये  संवाद निर्माण करून त्यांना उद्योग व्यवसायाच्या त्यांच्या क्षेत्रातील संधी उपलब्ध व्हाव्या, यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यांनी प्राप्त केलेल्या कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून, उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे या वयोगटातील असावे, उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत १२ वी उत्तीर्णसाठी ६ हजार रुपये, आयटीआय व पदविका उत्तीर्णसाठी ८ हजार रुपये आणि पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्णसाठी १० हजार रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे. तसेच कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) कालावधी सहा महिने असणार आहे. या योजनेचा युवकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. प्रभात लोढा यांनी केले आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे सचिव गणेश पाटील, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांनी या कार्यक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ