लाडक्या बहिणीला रक्षाबंधनपूर्वी मिळणार लाभ – पालकमंत्री हसन मुश्रीफ

0
11

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : राज्यात नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वकांक्षी योजनेची घोषणा केली. या योजनेतील पात्र बहिणांना येत्या रक्षाबंधनपूर्वी योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी सांगितले. त्यांनी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील योजनेबाबत झालेल्या कामकाजाची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांना दिली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.,  कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महिला व बाल विकास  अधिकारी सुहास वायंगडे,  शिल्पा पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 40 लक्ष लोकसंख्येपैकी किमान 9 लक्ष महिलांना या योजनेतून लाभ मिळण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्हा या योजनेत अर्ज नोंदणी करण्यात राज्यात अग्रेसर असून आत्तापर्यंत योजनेकरिता 2 लाख 58 हजार अर्ज प्राप्त  आहेत, त्यापैकी 1 लाख 30 हजार अर्जांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. याव्यतिरिक्त कित्येक महिलांनी घरातूनच ऑनलाईन नोंदणी केली आहे. ही संख्याही मोठी असून चांगल्या प्रकारे जिल्ह्यात या योजनेसाठी नोंदणी सुरू आहे. 15ऑगस्ट रोजी देशाचा स्वातंत्र्य दिन आहे तसेच 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनही आहे. रक्षाबंधन पूर्वी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचे नियोजन शासनाचे आहे. तरी या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व महिलांनी चांगल्या प्रकारे घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पालकमंत्री तथा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी यावेळी ग्रामीण तसेच शहरी भागातील अर्ज नोंदणी प्रक्रिये बाबतचा तपशीलवार आढावा घेतला.

बँकेत पुर्वीचे खाते असल्यास पून्हा नवीन बँक खाते काढण्याची आवश्यकता नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता कित्येक महिला बँकेत पुर्वीचे खाते असले तरी नवीन खाते उघडण्यास येत असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी याबाबत योजनेतील लाभार्थींना आवाहन केले आहे की नवीन खाते न उघडता आपण पुर्वीच्याच असलेल्या बँक खात्याला आधार नंबर जोडून त्या खात्याचे तपशील अर्ज नोंदणी करताना सादर करावेत. जर तुमच्याकडे बँक खाते नसेल तरच नवीन बँक खाते उघडा. लाभार्थीचे खाते शासकीय, खाजगी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., पोस्टल पेमेंट बँक, ग्रामीण बँक अशा आधार लिंक होत असलेल्या बँक यापैकी कोणत्याही एका बँकेत खाते असने गरजेचे आहे. लाभार्थीचे संयुक्त खाते असल्यास संबंधित महिलेचे पहिले नाव असणे आवशक आहे.

0000

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here